एका तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने वादात सापडलेले मेजर लितूल गोगोई यांना दिलासा मिळाला आहे. ज्या तरुणीसोबत गोगोई हॉटेलमध्ये गेले त्या तरुणीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिला आहे. ‘मेजर गोगोई हे माझे फेसबुक फ्रेंड असून स्वत:च्या मर्जीनेच मी त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये गेले होते. आम्हाला काही वेळ एकत्र घालवायचा होता’, असे त्या तरुणीने म्हटले आहे.

तरुणाचा मानवी ढाल म्हणून वापर करणारे मेजर नितीन लितूल गोगोई हे एका तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले. तरुणीसोबत गेल्याने हॉटेल कर्मचाऱ्याने त्या दोघांना प्रवेश नाकरला. तेव्हा वाद होऊन हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले होते. चौकशीनंतर गोगोईंची सुटका झाली. पण लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे गोगोई ज्या तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेले त्या तरुणीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला. ‘मी गोगोई यांना फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून भेटले. गोगोई यांनी आदिल अदनान नावाने एक फेक अकाऊंट सुरु केले. पण काही दिवसांनी अदिल अदनान हे अकाऊंट गोगोई यांचे असल्याचे माझ्या लक्षात आले, असे त्या तरुणीने म्हटले आहे. काही महिन्यांनी गोगोई यांनी देखील मला त्यांचे खरे नाव सांगितले होते, असे तरुणीने स्पष्ट केले.

तरुणीने गोगोईंचा मित्र समीर अहमदला ओळखत असल्याचे सांगितले. पण त्याच्याविषयीचा अधिक तपशील तिला सांगता आला नाही. तरुणीने सुनावणीदरम्यान वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डही सादर केला. ‘माझे शिक्षण १० वीपर्यंत झाले असून मी एका बचत गटात काम करते. मी स्वेच्छेनेच गोगोईंसोबत हॉटेलमध्ये गेले. आम्हाला काही वेळ एकत्र घालवायचा होता. माझ्या आईचा याला विरोध होता. आम्ही यापूर्वीही अनेकदा बाहेर भेटलो आहोत, असे तिने म्हटले आहे.

दरम्यान, पीडित तरुणीने गोगोई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोगोई यापूर्वीही दोन वेळा रात्री आमच्या घरात आले होते. याबाबत वाच्यता न करण्याचे त्याने बजावले होते, असे तरुणीच्या आईने म्हटले आहे.