२०१७ साली एका तरुणाची ‘मानवी ढाल’ केल्याबद्दल वादात सापडलेले मेजर लीतुल गोगोई यांच्यावर गेल्या वर्षी एका स्थानिक महिलेशी जवळीक साधल्याची शिक्षा म्हणून सेवाज्येष्ठतेत घट आणि काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडून लष्करी मुख्यालयात जाण्याची मानहानी ओढवली आहे.

महिलांशी जवळीक साधू नये अशा सूचना असतानाही एका स्थानिक महिलेशी जवळीक साधणे आणि ‘ऑपरेशनल एरिया’मध्ये असताना कर्तव्याच्या ठिकाणापासून दूर असणे अशा दोन बाबींसाठी गोगोई व त्यांचे चालक समीर मल्ला यांना कोर्ट मार्शलमध्ये दोषी ठरवण्यात आले.

अनधिकृतरीत्या गैरहजर राहिल्याचा आरोप असलेल्या मल्ला यांच्या युनिटच्या कंपनी कमांडरना त्यांना ‘कडक ताकीद’ देण्यासह त्यांच्या शिक्षेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कोर्ट मार्शलच्या कारवाईवर लष्करी मुख्यालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर गोगोई यांना खोऱ्याबाहेर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील अंतिम आदेश नुकताच मिळाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोगोई व मल्ला यांची ‘समरी ऑफ एव्हिडन्स’ फेब्रुवारीच्या सुरुवातीला पूर्ण झाली व त्यानंतर कोर्ट मार्शलची कारवाई सुरू करण्यात आली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.