पूर्व लडाखमधील पँगाँग भागात काल रात्री पुन्हा एकदा भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. भारतीय सैनिकांनी नियंत्रण रेषा पार करुन इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केला, असा आरोप चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केला आहे. पण प्रत्यक्षात चीन कांगावा करत असून चिनी सैनिकांनी भारतीय तुकडीवर गोळीबार केला. भारताच्या जवानांकडून कोणत्याही प्रकारचा गोळीबार करण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आलं आहे.

भारतीय ठिकाणं ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी सैन्याला रोखण्यासाठी भारतीय लष्कराला हवेत गोळीबार करावा लागला. दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडर्समध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु असताना गोळीबाराची ही ताजी घटना घडली आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात शेपाओ माऊँटन टॉप्सच्या भागात गोळीबाराची ही घटना घडली. भारतीय सैन्याकडून गोळीबार करण्यात आला असा दावा चीनकडून करण्यात आला असला तरी भारतानं मात्र चीनच्या या दाव्याचं खंडन केलं आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उंच टेकड्यांवर भारतीय सैन्य तैनात आहे. चीनला हीच गोष्ट खुपत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून चिथावणी देण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही बाजूंनी वरिष्ठ पातळीवरुन तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे शेपाओ डोंगराजवळ झालेली गोळीबाराची घटना मोठया हिंसक संघर्षामध्ये बदलली नाही.