मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग परिसरामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी होताना दिसत आहे. मंगळवारी भारतीय लष्कराने या भागात झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अनंतनागमध्ये मागील आठवड्यात ११ आणि १२ जून रोजी झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी कंठस्थान घातले. मात्र यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) पाच जवान शहीद झाले. याच पाच जणांपैकी एक असणाऱ्या मेजर केतन शर्मा यांनी चकमकीच्या काही तास आधी कुटुंबाला व्हॉट्स अॅपवरुन स्वत:चा एक फोटो पाठवून कदाचित हा माझा शेवटचा फोटो असेल असं म्हटलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवारी म्हणजेच ११ जून रोजी सकाळी सातच्या सुमारास मेजर केतन यांनी आपल्या व्हॉट्स अॅपच्या फॅमेली ग्रुपवर स्वत:चा फोटो पोस्ट केला आणि त्याखाली ‘कदाचित हा माझा शेवटचा फोटो आहे’ असे लिहिले होते. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेआधी केतन यांनी हा फोटो पोस्ट केला होता. त्याच दिवशी १९ राष्ट्रीय रायफल्स बटालियनमधील सदस्य असणारे केतन हे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये जखमी झाले. अचबल येथील बंडोरा गावामध्ये सुरक्षादलांची दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली त्यामध्येच मेजर केतन जखमी झाले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. व्हॉट्स अॅपवर फोटो पोस्ट केल्यानंतर काही तासांमध्येच दहशतवाद्यांशी लढताना केतन यांना वीरमरण आले. बंडोरामधील हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील अल-उमर-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने घेतील आहे.

केतन यांनी व्हॉट्स अॅपवर आपला शेवटचा फोटो या कॅप्शनसहीत फोटो पोस्ट केल्यानंतर त्यांची पत्नी तसेच भावाने त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कॉलला केतन यांनी उत्तर दिले नाही, अशी माहिती केतन यांच्या चुलत भावाने दिली. केतन यांच्याशी संपर्क होत नसल्याने चिंतेत असलेल्या शर्मा कुटुंबियांच्या घरी त्याच दिवशी दुपारी लष्करी अधिकाऱ्यांनी भेट देऊन केतन यांना वीरमरण आल्याची बातमी शर्मा कुटुंबाला दिली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मेरठ शहरामधील शर्मा यांच्या घराबाहेर मेरठवासियांची मोठी गर्दी झाली.

केतन यांचे वडील रविंद्र यांनी ‘केतन कायम मला त्याच्या आईची काळजी घेण्यास सांगायचा. आई आजारी असल्याने त्याला सतत तिची चिंता असायची’ असं ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

२९ वर्षीय केतन यांनी गुरुग्राममधील चांगली नोकरी सोडून देशसेवा करण्यासाठी लष्करामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. ‘कॅनटॉनमेंट परिसरामध्ये लहानाचा मोठा झालेला केतनला लहान वयापासून लष्करी शिस्तीची आवड होती’, असं त्याच्या चुलत भावाने ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले. संयुक्त संरक्षण सेवा परिक्षा उत्तीर्ण होऊन केतन २०१२ मध्ये लेफ्टनंट पदावर रुजू झाला होता. लष्करात भरती झाल्यानंतर केतनने लग्न केले. केतनला एक लहान मुलगी आहे. उत्तर प्रदेश सरकारने केतनच्या कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच एका रस्त्याला केतनचे नाव देण्यात येणार असल्याचे सरकारमार्फत सांगण्यात आले आहे.