श्रीनगर येथील हॉटेलमध्ये एका महिलेसोबत गेल्याने मेजर लितुल गोगोई यांना कारवाईस सामोरे जावे लागले असून त्यांना सेवाज्येष्ठता गमवावी लागणार आहे. गोगोई यांना सहा महिन्यांचा सेवाज्येष्ठतेचा अधिकार गमावण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लितुल गोगोई हे मे २०१८ मध्ये एका महिलेसोबत श्रीनगरमधील हॉटेलमध्ये गेले होते. ही महिला १८ वर्षांची होती, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी समवेत असलेल्या महिलेवरुन गोगोई यांना हटकले असता त्यांचे भांडण झाले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर गोगोई यांच्याविरोधात कोर्ट मार्शलच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आता गोगोई यांच्याविरोधात कोर्ट मार्शलची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना सहा महिन्यांचा सेवाज्येष्ठतेचा अधिकार गमवावा लागणार आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सैन्यातील सूत्रांनी ही माहिती दिली. स्थानिक महिलेशी जवळीक करुन कामाच्या ठिकाणापासून दूर गेल्याच्या प्रकरणी त्यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे.

दरम्यान, गोगोई हे यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. काश्मीरमध्ये एका व्यक्तीला जीपला बांधून दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचावासाठी मानवी ढाल केली होती. ९ एप्रिलला श्रीनगर येथील निवडणुकीच्या वेळी हा प्रकार झाला होता. त्यावेळी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी गोगोई यांच्या कृत्याचे समर्थन करुन त्यांना प्रशस्तिपत्र दिले होते.