दिल्लीतील लष्कराच्या बराड स्कॉयर भागात लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची शनिवारी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी लष्करातील मेजर निखिल राय हांडा याला अटक करण्यात आली आहे. हत्येचा आरोप असलेला हांडा हा हत्या झालेली महिला आणि तिचा पती यांचा मित्र होता.


पोलिसांच्या माहितीनुसार, मेजर निखिल राय हांडा याच्यावर मेजर अनिल द्विवेदी यांची पत्नी शैलजा द्विवेदी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मेजर निखिल या दोघांचाही सामाईक मित्र आहे. मेजर द्विवेदी यांनी पत्नीची हत्या मेजर निखिलने केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

आरोपी मेजर निखिलला मेरठमधून अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमांतून तो काही दिवसांपूर्वी नागालँड येथे दिसला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱे पोलिस सहआयुक्त मधुप तिवारी यांनी सांगितले की, या प्रकरणी आमच्याकडे काही ठोस पुरावे हाती लागले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पुढील तपासानंतर हा हत्येचा प्रकार असावा, असे दिसते. याप्रकरणी मृत शैलजा यांचे फोन कॉल्सही तपासण्यात येत आहेत.

शनिवारी दुपारी १.२८ वाजता बराड स्क्वेअर भागातून जाणाऱ्या एका प्रवाशाने पोलिसांना खबर दिली होती की, रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह पडला आहे. त्यानंतर काही तासांपर्यंत या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. संध्याकाळी साडेचार वाजता ज्यावेळी मेजर अमित द्विवेदी यांनी पोलिसांमध्ये आपली पत्नी बेपत्ता असल्याची सूचना दिली त्यानंतर संबंधित महिलेचा मृतदेह या मेजर द्विवेदी यांच्या पत्नीचा असल्याचे उघड झाले.