दिल्लीत लष्कराच्या एका मेजरने दुसऱ्या मेजरच्या पत्नीची एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याच्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी मेजर निखिल राय हांडाने सर्वातआधी २०१५ साली फेसबुकवर शैलजाचा फोटो पाहिला होता व पहिल्या नजरेतच तिच्याकडे आकर्षिक झाला होता असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

मेजर हांडाने सर्वात आधी एका म्युचअल फ्रेंडच्या फेसबुकवर शैलजाचा फोटो पाहिला होता. त्यानंतर त्याने फेसबुकवरुन तिच्याबरोबर मैत्री केली. त्यानंतर शैलजाच्या जवळ जाण्यासाठी मेजर हांडाने तिचा पती अनिल द्विवेदीशी मैत्री केली अशी माहिती दिल्ली पोलिसाती सूत्रांनी दिली. ओळख झाल्यानंतर मेजर हांडा नियमितपणे मेजर अनिल द्विवेदीच्या नागालँड येथील घरी जाऊ लागला. तिथूनच एकतर्फी प्रेमाची सुरुवात झाली.

मेजर हांडाने शैलजाजवळ तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली पण शैलजाने त्याला नकार दिला. २३ जूनला शनिवारी शैलजा फिजियोथेरपीसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यावेळी तिला मेजर हांडांच्या कारमध्ये शेवटचे पाहण्यात आले. गाडीत दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले त्यानंतर संतापलेल्या मेजर हांडाने गळा कापून तिची हत्या केली व तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला.

शनिवारी दुपारी १.२८ वाजता बराड स्क्वेअर भागातून जाणाऱ्या एका प्रवाशाने पोलिसांना खबर दिली होती की, रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह पडला आहे. त्यानंतर काही तासांपर्यंत या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. संध्याकाळी साडेचार वाजता ज्यावेळी मेजर अमित द्विवेदी यांनी पोलिसांमध्ये आपली पत्नी बेपत्ता असल्याची सूचना दिली त्यानंतर संबंधित महिलेचा मृतदेह या मेजर द्विवेदी यांच्या पत्नीचा असल्याचे उघड झाले. आरोपी मेजर निखिलला मेरठमधून अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमांतून तो काही दिवसांपूर्वी नागालँड येथे दिसला होता.