भारतात गेल्या सहा महिन्यात ज्या घटना घडल्या आहेत त्यात हिंदुत्ववादी राजकारणाचा उदय दिसत असून त्यामुळे देशात बहुसंख्याकवादाचा धोका नाकारता येत नाही, असे मत अमेरिकी इतिहासकार डेव्हिड लेलिव्हेल्ड यांनी व्यक्त केले.
अलिगड मुस्लीम विद्यापीठात एका व्याख्यानात त्यांनी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे भारताला भेट देत आहेत पण त्यातून फार मोठे लाभ मिळतील असा अतिउत्साह दाखवण्याची चूक कुणी करू नये.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जितक्या पटकन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाकारलेला व्हिसा मंजूर केला ते अमेरिकेतील बहुतांश लोकांना आवडलेले नाही व ओबामा यांच्या भारत भेटीने त्यांचीच मानवी अधिकारांचा पुरस्कर्ता म्हणून असलेली प्रतिमा खराब होईल. गेल्या सहा महिन्यात भारतात ज्या घटना घडल्या आहेत त्या हिंदुत्ववादी राजकारणाचा आविष्कार होत्या व त्यातून सर सय्यद अहमद खान यांनी व्यक्त केलेली बहुसंख्यांकवादाची भीती निराधार ठरत नाही.
ओबामा यांच्या भारतभेटीच्या फलश्रुतीविषयी त्यांनी सांगितले की, त्यांच्या भेटीतून भारताला फार काही लाभ मिळणार आहेत असे समजण्याचे कारण नाही. भारत व अमेरिकेतील निवडक कंपनी समूह ओबामांच्या भेटीचा फायदा घेतील पण सामान्य लोकांना काहीच फायदा होणार नाही. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मोदी यांना व्हिसा नाकारला होता पण त्यांच्याशी इतर विषयांवर मतभेद असले तरी ते या मुद्दय़ावर अजिबात नव्हते. मानवी हक्कांच्या आधारे मोदी यांना व्हिसा नाकारण्यात आला होता.
अलिगड मुस्लीम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लीम महिलांच्या शिक्षणात १८ व्या शतकात मोठे काम केले. अंधश्रद्धा दूर केल्या, जुन्या हानिकारक चालीरीती संपवल्या. महिलांना आधुनिक शिक्षण दिले. मुस्लीम लोक मागासलेले होते त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. सर सय्यद यांनी १९ व्या शतकात अलिगड चळवळ सुरू केली व त्यांनी महिला शिक्षणाचा प्रश्न भारतातच नव्हे तर युरोपात उपस्थित केला. सर सय्यद हे दोन देशांच्या सिद्धांताचे जनक होते हा दावा लेलिव्हेल्ड यांनी फेटाळला. विविधतेने नटलेल्या समाजाविषयी तळमळ व वचनबद्धता हे दोन गुण सर सय्यद यांच्यात होते. समाजाच्या प्रगतीची फळे सगळ्यांना सारखी मिळत नाहीत असे ते म्हणत. सर सय्यद यांच्या काळात पाकिस्तानच्या कल्पनेने जन्मही घेतलेला नव्हता पण त्यांना भारतीय उपखंडाचे विभाजन कधीच मान्य नव्हते. ब्रिटिश गेल्यानंतर आयुष्याच्या शेवटी मात्र त्यांनी मुस्लिमांच्या हक्कांविषयी चिंता व्यक्त केली होती. भारतात लोकशाही आली तरी अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला त्याची ओळख टिकवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, असे ते म्हणत असत असे लेलिव्हेल्ड यांनी सांगितले.