काँग्रेस खासदार शशी थरूर यांची टीका
‘मेक इन इंडिया’सारखे विकासाचे धोरण आणि द्वेषमूलक भाषा एकत्रितपणे नांदू शकत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार शशी थप्रुर यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून केली जाणारी अशा प्रकारची विधाने देशाच्या शक्तीला बाधा पोहोचवणारी आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हार्वर्ड विद्यापीठाच्या भारतीय वार्षिक अधिवेशनात बीजभाषण करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, देशाची विश्वासार्हता राखण्यासाठी प्रथम अंतर्गत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. केवळ दहशतवाद हेच एकमेव आव्हान नसून नागरिकांना आरोग्यसंपन्न व संपन्न बनविणे गरजेचे आहे. प्रगतीचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचायला हवेत. भारताची शक्तिस्थळे अबाधित राखण्यासाठी भारतीयत्वाची संकल्पना टिकविणे आवश्यक आहे. विविधतापूर्ण संस्कृती ही या संकल्पनेचा मूलाधार आहे.
मुस्लिम असण्यापेक्षा गाय असणे सुरक्षित आहे, असे लोकांना वाटू लागणे हे योग्य नाही, असे मत व्यक्त करत थरूर यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे आपल्या एका मित्राने भारतात गुंतवणूक करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.