संरक्षण आयातीवरचे भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी संरक्षण उत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाईल तसेच मुक्त कर प्रणालीतील भेद दूर करण्यात येतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील दहाव्या एरोशोच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. परदेशी कंपन्या या केवळ विक्रेत्या नसून सामरिक भागीदार आहेत असे ते म्हणाले.
मोदी यांनी सांगितले की, आपल्या देशापुढे सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. येत्या पाच वर्षांत ७० टक्के लष्करी साधनसामुग्री आपल्या देशात तयार झाली पाहिजे व संरक्षण उपकरणांचा पहिल्या क्रमांकाचा आयातदार हा आपल्या देशावरचा शिक्का पुसला गेला पाहिजे. आपल्याला लष्कराचे आधुनिकीकरण करताना संरक्षण सिद्धता वाढवली पाहिजे.
मेक इन इंडिया मोहिमेत संरक्षण उद्योग हा मध्यवर्ती स्थानी आहे, आम्ही यात सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र व परदेशी कंपन्या या सर्वाना वाव देणार आहोत. परदेशी कंपन्यांनी केवळ विक्रेते न राहता सामरिक भागीदार बनले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना यांनी सांगितले की, आपल्याला नवीन तंत्रज्ञानाची, कौशल्यांची  तसेत उत्पादन क्षमतेची गरज आहे. भारतातून तिसऱ्याच देशांना संरक्षण सामुग्री निर्यात करता आली पाहिजे कारण आशियात आपली भागीदारी वाढत आहे. संरक्षण खरेदी धोरणे व प्रक्रिया सरकार बदलत आहे. भारतात उत्पादन करण्यास यापुढे प्राधान्य राहील. सरकारने थेट परदेशी गुंतवणुकीत ४९ टक्क्य़ांपर्यंत वाढ केली आहे. जर आधुनिक तंत्रज्ञान येथे आले तरी ती गुंतवणूक मर्यादा आणखी वाढवता येईल. परदेशी संस्थांच्या गुंतवणुकीची मर्यादा २४ टक्के वाढवण्यात आली आहे. अनेक सामुग्रीसाठी परवाना पद्धत रद्द करण्यात आली आहे, जिथे ती आवश्यक आहे तिथे ती सुलभ करण्यात येईल. आयातीवर लाखो डॉलर खर्च करण्यापेक्षा आयात कमी करून देशांतर्गत संरक्षण उद्योगांना महत्त्व देण्यात येईल असे ते म्हणाले.
भारताच्या संरक्षण उद्योगात २० हजार कर्मचारी काम करीत आहेत त्यात काही अभियंते व वैज्ञानिक आहेत ते वर्षांला ७ अब्ज डॉलरचे उत्पादन करतात व छोटय़ा, मध्यम उद्योगांनाही त्यातून लाभ होतो. भारताची ६० टक्के आयात ही संरक्षण क्षेत्रातील आहे ती २५ टक्के कमी झाली तरी भारतात १ लाख ते १ लाख २० हजार कौशल्याधारित रोजगार निर्माण होतील. आपण देशांतर्गत संरक्षण उत्पादने खरेदी ४० टक्क्य़ांवरून ७० टक्क्य़ांवर नेली तर संरक्षण उद्योगातील उत्पादन आर्थिक दृष्टिकोनातून दुप्पट होईल, त्यामुळे उत्पादन क्षेत्राचे चित्रच बदलून जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.