महिलांच्या खोटय़ा तक्रारींना बळी पडणाऱ्या पुरुषांसाठी यंत्रणा उभी करण्याची राष्ट्रीय महिला आयोगाला सूचना

खोटय़ा तक्रारींच्या आधारे घरगुती हिंसाचार, हुंडय़ासाठी छळ आणि बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये पुरुषांना अडकविण्याच्या वाढत्या प्रकारांची दखल केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री मेनका गांधी यांनी घेतली आहे. महिलांच्या खोटय़ा तक्रारींना बळी पडणाऱ्या पुरुषांना तक्रारी मांडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्याची सूचना त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला केली.

‘‘माझ्या या सूचनेवर महिलांकडून, महिलांच्या संघटनांकडून मोठी टीका होण्याची शक्यता आहे आणि कदाचित आपल्याविरुद्धची प्रत्येक तक्रार खोटी असल्याचा बनाव करण्याची संधी पुरुषांना मिळण्याचा धोका नक्कीच आहे. तरीसुद्धा आपल्याला नाहक अडकविले जात असल्याच्या पुरुषांच्या तक्रारींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठी वाढ होत आहे. आपल्याला नेमकी वस्तुस्थिती तपासून पाहावी लागेल. त्यासाठी पंधरा दिवसांमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने अशा पुरुषांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एखादी यंत्रणा सुरू करावी,’’ असे मेनका गांधींनी आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर महिलांनी आयोगाकडे केलेल्या तक्रारीतील तथ्य शोधण्यासाठी कार्यक्षम कार्यप्रणाली तयार करण्याचीही सूचना त्यांनी केली. आयोगाकडे दर वर्षी सुमारे पंचवीस हजारांहून अधिक तक्रारी येत असतात.

पुरुषांना तक्रार करण्यासाठी केल्या जाणाऱ्या नव्या यंत्रणेबद्दलही सूचना श्रीमती गांधींनी केल्या. ‘‘एक तर तक्रार अर्जाना आधार क्रमांक किंवा मोबाइलशी जोडले पाहिजे आणि त्याचबरोबर या प्रामाणिक सुविधेचा गैरफायदा घेऊन पुरुषांकडून महिलांविरुद्ध उलट तक्रारी होणार नसल्याची काळजी घेतली पाहिजे,’’ असे त्यांनी नमूद केले.

हुंडा प्रतिबंधक कायद्याचा (४९८ अ कलम) दुरुपयोग रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्याच्या दिवशीच मनेकांनी हे पत्र लिहिले. ‘४९८ अ’ हे भारतीय दंडविधानातील सर्वाधिक दुरुपयोग होणारे कलम असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी म्हटलेले आहे. तसेच अनेक घटनांमध्ये महिलांकडून बलात्कार, घरगुती हिंसाचारासारख्या कडक तरतुदी असलेल्या कायद्यांचा गैरवापर होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर मनेकांनी पीडित पुरुषांच्या प्रश्नांवर महिला आयोगाचे लक्ष वेधले आहे.