तालिबानने जेव्हापासून अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे तेव्हापासून या मध्य आशियामधील देशावर ओढावलेल्या परिस्थितीसाठी जगभरातील अनेक देशांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दोषी ठरवलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आता अमेरिकेमधूनही या निर्णयाविरोधात बायडेन यांना दोषी ठरवत आरोप केले जात आहे. बायडन यांनी अमेरिकन सैन्याला अफगाणिस्तानमधून पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि ऑगस्ट महिना संपण्याआधीच तो अंमलातही आणला. बायडेन यांनी काही आठवड्यांपूर्वी सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानची ताकद वाढली आणि त्यांनी देश ताब्यात घेतला. यावरुनच बायडेन हे टिकेचे धनी ठरत असतानाच आता अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी बायडेन यांच्यावर याच निर्णयावरुन टीका करणारे मोठ्या आकाराचे होर्डिंग लावण्यात आलेत. या होर्डिंगवर बायडेन यांना तालिबानी दहशतवाद्याच्या रुपात दाखवण्यात आलं असून त्यासोबत, “मेकिंग द तालिबान ग्रेट अगेन” असा मजकूर लिहिण्यात आलाय.

नक्की वाचा >> “पुढील एक ते दोन वर्षांमध्ये…”; अमेरिकेला आता अल-कायदाची भीती, सुरक्षा यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार पेनसिल्व्हेनियाचे माजी सीनेटर स्कॉट वैगनर यांनी राष्ट्राध्यक्षांविरोधात हे कॅम्पेन सुरु केलं आहे. बायडेन यांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण जगासमोर अमेरिकेला शर्मेने मान खाली घालावी लागल्याचा आरोप वैगनर यांनी केलाय. अमेरिकेवर जगभरामधून बायडेन यांच्या निर्णयामुळे छी थू केली जात आहे, असं सांगतानाच पुढील दोन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बायडेन यांचे असे होर्डिंग लावले जाणार असल्याचंही वैगनर यांनी स्पष्ट केलंय.

नक्की वाचा >> अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करणाऱ्या तालिबानला इराणचा मोठा दणका, शेजाऱ्यांबद्दल म्हणाले…

या होर्डिंगवर बायडेन यांना तालिबानी वेशात दाखवण्यात आलं आहे. बायडेन यांच्या हातामध्ये रॉकेट लॉन्चरही दाखवण्यात आलाय. स्कॉट वैगनर यांनी या फोटोच्या माध्यमातून बायडेन यांनी अमेरिकन लष्कराला परत बोलवून तालिबानला मदत केल्याचा टोला लगावला आहे. तालिबानला पुन्हा महान बनवण्यासाठी बायडेन प्रयत्न करत असल्याचं, “मेकिंग द तालिबान ग्रेट अगेन” असं म्हटलं आहे. मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये फार गाजली होती. त्याच पार्श्वभूमीवर होर्डिंगवर हा मजकूर छापण्यात आलाय. या होर्डिंगसचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.

नक्की वाचा >> ८००० कोटींच्या मदतीसाठी तालिबानने संपूर्ण जगाचे मानले आभार; मात्र अमेरिकेला मारला टोमणा

बायडेन यांनी अचानक अमेरिकेमधून सैन्य माघारी घेण्याची घोषणा केलेली. बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील लष्कर तालिबानचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, असं कारण दिलं होतं. मात्र या घोषणेनंतर अवघ्या काही दिवसांमध्ये तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवत बायडेन यांचा दावा खोटा ठरवला होता. या निर्णयानंतर बायडेन यांच्यावर जगभरामधून टीका झाली. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी बायडेन यांना दोषी ठरवलं होतं. सैन्य माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर काबूल विमानतळावर अमेरिकन तळाजवळ जालेल्या स्फोटामध्ये अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर बायडेन यांच्यावर टीका झालेली. या निर्णयामुळे बायडेन यांच्या प्रतिमेला धक्का पोहचल्याचं मत राजकीय तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतात.