काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून तेथील मुलांना आताच्या तणावग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढून शाळेत जाण्यासाठी मदत करावी, असे आवाहन नोबेल विजेत्या पाकिस्तानी शिक्षण हक्क कार्यकर्त्यां मलाला युसुफझाई यांनी  केले आहे. त्यावर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

काश्मीरमध्ये पाच ऑगस्टपासून जनजीवन विस्कळीत आहे. तेथे कलम ३७० रद्द करून विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर हिंसाचार होऊ नये यासाठी निर्बंध जारी करण्यात आले आहेत. अनेक दुकाने व शाळा तसेच सार्वजनिक वाहतूक अजूनही बंद आहे.

‘‘संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील नेत्यांनी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. काश्मीरमधील लोकांचे म्हणणे ऐकावे. तसेच मुलांना सुरक्षित शाळेत पाठवण्याची व्यवस्था करावी,’’ असे युसुफझाई यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे. गेले चाळीस दिवस काश्मीरमधील मुले  शाळेत जाऊ शकलेली नाहीत, मुली घराच्या बाहेर पडण्यास घाबरत आहेत, असे सांगून त्यांनी म्हटले आहे, की काश्मीरमधील मुलींच्या कहाण्या मला ऐकायच्या आहेत. दूरसंचार यंत्रणेवरच बंदी असल्याने त्यांचे म्हणणे जगासमोर आलेले नाही. त्यांचा आवाज दाबून उपयोगाचे नाही, त्यांचे म्हणणे जगासमोर आले पाहिजे. ‘लेटसकाश्मीरस्पीक’ या हॅशटॅगने मलाला यांनी काही ट्वीट संदेश टाकले आहेत.

मलाला यांना प्रत्युत्तर देताना भाजपच्या कर्नाटकमधील खासदार शोभा करंदलाजे म्हणाल्या की, मलाला यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांसाठीही वेळ काढून  काम करावे. त्यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया नोंदविली आहे. त्यात त्यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्य समाजातील मुलींवरील जबरदस्तीच्या घटनांचे स्मरण मलाला यांना करून दिले आहे. या मुलींवर होणारे अत्याचार आणि त्यानंतर धर्मातरासाठी होणारी सक्ती याबाबत मलाला यांनी तेथील अल्पसंख्य समुदायांशी बोलावे, असे आवाहन खासदार करंदलाजे यांनी केले आहे.

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात लागोपाठ ४१ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीत होते.  व्यापारी आस्थापने व दुकाने बंद होती. इंटरनेट सेवाही काश्मीरमध्ये बंद आहे. लँडलाइन फोन काश्मीर खोऱ्यात चालू आहेत. कुपवाडा व हांडवारा या उत्तर काश्मीरमधील जिल्ह्य़ात मोबाइल चालू असून व्हॉइस कॉल शक्य आहेत. शाळा पुन्हा सुरू करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत.