जम्मू काश्मीरमधील हिंसाचारावर नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने चिंता व्यक्त करत भारत आणि पाकिस्तानने काश्मीरमधील वादावर समन्वयाने तोडगा काढावा असे आवाहन केले आहे. काश्मिरी जनतेला त्यांचे मूलभूत मानवी हक्क मिळालेच पाहिजे असेही मलालाने म्हटले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये जुलैमध्ये बुरहान वानी या दहशतवाद्याला ठार मारल्यापासून काश्मिरमध्ये हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारामुळे काश्मीरमधील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यावर मलाला युसुफझाईने नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिले आहे. संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुकावे लागत आहे अशी खंत मलालाने व्यक्त केली. नि:शस्त्र आंदोलनकर्ते मारले जातात, हजारो लोक जखमी होतात, पॅलेट गन्समुळे शेकडो लोकांना अंधत्व येते आणि हे सगळ आंदोलन थांबावे यासाठी केले जाते. या अमानवीय घटना रोखाव्यात असे तिने म्हटले आहे. काश्मीरमधील परिस्थितीवर मलाला युसुफझाई म्हणाली, भारत, पाकिस्तान आणि संयुक्त राष्ट्रसंघाने काश्मीरमधील परिस्थिती सुधरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. काश्मीरमधील जनता ही जगातील इतर सामान्य जनतेप्रमाणेच आहे. त्यांनादेखील मूलभूत मानवी हक्क दिलेच पाहिजे असे तिने म्हटले आहे. त्यांचे जीवन भीती आणि दडपशाहीपासून मुक्त असले पाहिजे असे  तिने आवर्जून सांगितले.

काश्मीरमध्ये जे चुकीचे घडले, त्या चुका सुधारुन काश्मीरी लोकांना त्यांचा आत्मसन्मान, स्वातंत्र्य परत मिळवून द्या असे आवाहन तिने केले. जम्मू काश्मीरमधील जनतेचा माझे बहिण भावंड असा उल्लेख करत काश्मीर लोकांशी माझे भावनिक नाते असल्याचे मलालाने सांगितले. मलालाच्या या विधानावरुन ट्विटरवर मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.