मुलींच्या शिक्षणासाठी प्रचार केल्याप्रकरणी तालिबान्यांच्या हल्ल्यात जखमी झालेली पाकिस्तानची शाळकरी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसफजाई हिची इंग्लंडमधील सर्वात प्रभावशाली आशियाई म्हणून निवड करण्यात आली आहे. येथील एका साप्ताहिक प्रकाशनाने ही निवड केली आहे.
गेल्या वर्षी स्वात खोऱ्यात तालिबान्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या मलालासह कैनात रियाझ आणि शाझिया रमझान यांना त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल बुधवारी रात्री साप्ताहिक जीजी २ (गारवी गुजरात २) नेतृत्व पुरस्कार २०१३ या सोहळ्यात  जीजी २ हॅमर पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंग्लंडचे उपपंतप्रधान निक क्लेग हे या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
साप्ताहिकातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या जीजी २ शक्तिशाली १०१ च्या यादीत मलालाची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली.