तीन आफ्रिकी देशात मुलांना मलेरिया प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. केनिया, घाना व मलावी या देशात लसीकरण सुरू करण्यात आले असून या भागात सध्या मलेरिया म्हणजे हिवतापाची लागण मोठय़ा प्रमाणात आहे. दक्षिण आफ्रिकी देश असलेल्या मलावीसह केनिया व घानात बालकांना ही लस दिल्याने या रोगापासून पूर्ण संरक्षण मिळणार आहे. नवीन लस ही चाळीस टक्के जास्त प्रभावी आहे. तज्ज्ञांच्या मते मलेरियाविरोधातील लढाई सुरू आहे. यात उपचारांना काही वेळा जंतू दाद देत नाहीत त्यामुळे धोका वाढत चालला आहे. लस तयार करून ती मुलांना दिल्याने या रोगाला आळा बसणार आहे.

आफ्रिकेतील देशांमध्ये मलेरियाने दरवर्षी चार लाख लोक मरतात, त्यात दोन तृतीयांश हे पाच वर्षांखालील मुले असतात. मलेरियात अंगदुखी, ताप ही लक्षणे असतात.

बालकांना मलेरिया झाल्याने मातांना त्यांचे रोजगारही गमवावे लागतात. या भागात मका व उसाची शेती असल्याने डासांचे प्रमाण अधिक आहे. पावसाळ्यात डासांचे प्रमाण जास्त असल्याने त्या काळात धोका अधिक असतो. लस दिल्याने तो कमी होणार आहे. सध्या वैद्यकीय पथके तेथे महिन्यातून दोनदा भेटी देत असून मलेरियाच्या लशी पोर्टेबल शीतकातून आणल्या जात आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मते मलेरियारोधक औषधांची जागा लस घेऊ शकणार नाही. कीटकनाशक मच्छरदाण्या हा यात प्रभावी उपाय आहे. नवीन लस तयार करण्यास तीन दशके लागली असून मलेरियास पाच प्रकारचे परोपजीवी जंतू कारणीभूत असतात. डासांमुळे सोपोरोझोइट हे परोपजीवी जंतू शरीरात पसरतात. ते यकृतात गेले तर त्यांची संख्या वाढून ते पुन्हा रक्तात येतात.