जगातील मलेरियाची पहिली लस तयार झाली असून तिला युरोपीय नियंत्रकांनी हिरवा कंदील दिला आहे. आता या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
या लशीचे नामकरण मॉसक्विरिक्स असे करण्यात आले असून लंडनच्या युरोपीयन मेडिसीन एजन्सीने या लशीला तीस वर्षांच्या संशोधनानंतर मान्यता दिली आहे. दोन लाख तीस हजार पानांची माहिती तपासून त्याला मान्यता दिली आहे.
आता ही लस जागतिक आरोग्य संघटना याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात तपासून पाहणार असून तिला मंजुरी मिळाली, तर आफ्रिकेसह जगभरातील मुलांसाठी ते महत्त्वाचे पाऊल ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे. अ‍ॅव्हीएन इन्फ्लुएंझा व इतर संसर्गजन्य रोगांबाबतचे प्रवक्ते ग्रेगरी हार्टल यांनी सांगितले, की मलेरियाची लस या टप्प्यापर्यंत येण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे युरोपीय मेडिसीन एजन्सीने दिलेला सकारात्मक अभिप्राय महत्त्वाचा आहे. या संस्थेने काढलेले निष्कर्ष आता तपासून पाहिले जातील व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने त्याचा विचार केला जाईल, असे हार्टल यांनी सांगितले. विकसनशील देशातील स्थिती व किफायतशीरता या मुद्दय़ांचाही विचार केला जाईल.
पूर्व आफ्रिकेतील ग्लॅक्सोस्मिथकलाइनचे प्रवक्ते अ‍ॅलन पांबा यांनी सांगितले, की ही अतिशय महत्त्वाची लस आहे व त्यावर आजपर्यंत ३५६ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. संशोधक व औषध कंपन्या गेल्या काही दशकांपासून मलेरियाची लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.
काही लशी तयार करण्यात आल्या पण चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यांत अपयशी ठरल्या आहेत. मलेरियाच्या लशीला प्राथमिक मान्यता मिळाली हे महत्त्वाचे असले तरी खरी कसोटी पुढेच आहे. मलेरियाने सहा लाख लोक जगभरात मरतात व त्यात सहारा आफ्रिकेतील पाच देशांतील मुलांचा समावेश मोठय़ा प्रमाणात असतो.

मलेरियाची लस

’मॉसक्विरिस लशीवर ३५६ दशलक्ष डॉलर्स खर्च
’नोव्हेंबर महिन्यात अंतिम मंजुरीची अपेक्षा
’दरवर्षी मलेरियाचे सहा लाख बळी
’अंतिम टप्प्यात पोहोचणारी पहिलीच लस