दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अनिल नेडुमंगड यांचं शुक्रवारी निधन झालं. ते ४८ वर्षांचे होते. केरळमधील मलंकारा धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी ट्विट करत अनिल यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

अनिल हे त्यांच्या आगामी ‘पीस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी थोडुपुझा येथे गेले होते. यावेळी चित्रीकरण सुरु असताना चित्रपटातील कलाकार व क्रू मेंबर्सनी ब्रेक घेतला होता. या ब्रेकच्या काळात ते मित्रांसोबत धरणावर पोहण्यास गेले होते. मात्र, याचवेळी अनिल पोहत असताना खोल पाण्यात गेले आणि पाण्याच्या प्रवाहामुळे ते बुडाले.


“काहीच नाही. काय बोलावे सुचत नाहीये. माझ्याकडे शब्द नाहीयेत काही बोलायला. तुमच्या आत्मास शांती लाभो हीच अपेक्षा”, असं ट्विट पृथ्वीराज सुकुमारन यांनी केलं आहे.

दरम्यान, अनिल हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता होते. त्यांनी ‘अय्यप्पनम कोशियुम’, ‘कम्मति पाड़म’, ‘नेजन स्टीव लोपेज’ आणि ‘पोरिंजू मरियम जोस’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.