अभिनेता पृथ्वीराजच्या आईची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली आहे. केरळमध्ये पावसाचे थैमान आणि पुराचा कहर पाहायला मिळतो आहे. आत्तापर्यंत पुरामुळे ७२ जणांचा बळी गेला आहे. ८ ऑगस्टपासूनच हा पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या ठिकाणी जी आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे लोकांचे अतोनात हाल होत आहेत.

पृथ्वीराज सुकुमारन या मल्ल्याळम अभिनेत्याच्या घरालाही या पावसाचा फटका बसला. तसेच त्याची आई मल्लिका सुकुरमारन या पुराच्या पाण्यात अडकल्या. मल्लिका सुकुमारन याही ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांची पुराच्या संकटातून सुटका करण्यात आली आहे. एका मोठ्या भांड्यात त्यांना बसवण्यात आले आणि पुराच्या पाण्यातून त्यांची सुटका करण्यात आली. अभिनेता पृथ्वीराजच्या घरात पूर्ण पाणी साठले आहे अशीही माहिती समोर आली आहे.

केरळच्या १२ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लष्कराने मदतकार्याचा वेग वाढवला असून पुण्याहून इंजिनिअर टास्क फोर्सची विशेष टीम केरळला रवाना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली आहे. केंद्र सरकार केरळच्या जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे असून कुठल्याही मदतीसाठी तयार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. राष्ट्रीय आप्तकालिन बचाव दलाच्या आणखी १२ टीम केरळमध्ये रवाना करण्यात आल्या आहेत.