मलेशियाच्या गेल्या वर्षी आठ मार्चला बेपत्ता झालेल्या बोइंग ७७७ विमानाच्या सांगाडय़ाचे आणखी नवीन धातूच्या भागाच्या स्वरूपातील अवशेष ला रियुनियन बेटांवर सापडले आहेत, असे तपासकर्त्यांनी म्हटले आहे. ते भाग विमानाच्या पंखाचे होते असे समजते.
त्यांच्या मते हिंदी महासागरातील रियुनियन बेटांवर एमच ३७० या मलेशिया एअरलाइन्सच्या उड्डाणातील विमानाचे अवशेष आधीही सापडले होते व ते फ्रान्सला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, तपासकर्त्यांच्या मते रविवारी सकाळी अवशेष सापडले आहेत, त्यांची तपासणी करण्यात येईल.
आधी फ्रान्सला पाठवण्यात आलेले अवशेष  त्याच बेपत्ता विमानाचे असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना १०० चौरस सेंटीमीटर म्हणजे १५ चौरस इंचांचा एक तुकडा उत्तरेकडील या बेटावर सापडला असून एका व्यक्तीने पोलिसांना ७० सेंटीमीटर म्हणजे २७ इंचांचा आणखी एक तुकडा दिला आहे. बुधवारी या विमानाचे अवशेष सापडण्यास सुरुवात झाली असून एक वर्षभर या विमानाचा कुठलाही अवशेष सापडला नव्हता.
एमएच ३७० उड्डाणातील बोइंग ७७७ हे विमान समुद्रात बेपत्ता झालेले पहिले बोइंग विमान आहे. या विमानाच्या अवशेषांचे तुकडे फ्रान्सला तपासणीसाठी पाठवले असले, तरी ला रियुनियन बेटावरील स्थानिक लोक विमानाच्या आणखी अवशेषांच्या शोधात आहेत.