जवळपास वर्षभरापूर्वी अत्यंत रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले मलेशिया एअरलाइन्सचे ‘एमएच-३७०’ या विमानाची दिशा कोणीतरी जाणीवपूर्वक बदलली आणि ते अंटाक्र्टिकाच्या दिशेने नेल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. २३९ जणांना घेऊन निघालेल्या या विमानाच्या कॉकपीटमध्ये घुसून कोण्या एका व्यक्तीने ही कृती केली असावी, असेही या तज्ज्ञांच्या एका गटाने म्हटले आहे.
नव्या माहितीपटात हवाईतज्ज्ञांच्या एका गटाने हा दावा केला आहे. विमानाची प्रवासाची दिशा बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला असण्याची शक्यता आहे, असे पुढे स्पष्ट करण्यात आले आहे.
वैमानिकाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यानंतर पुढील ९० मिनिटांत विमानाने तीन तीव्र वळणे घेतली की जी उड्डाणादरम्यान घातक ठरू शकतात. ‘नॅशनल जिओग्राफिक’ या वाहिनीवर  ‘मलेशियन ३७०: काय घडले? या माहितीपटात अनुभवी संशोधकांनी हा दावा केला आहे. ८ मार्च रोजी हा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. याच दिवशी बीजिंगकडे निघालेले हे विमान बेपत्ता झाले होते.
तज्ज्ञांनी उपग्रहाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या माहितीची नव्याने पडताळणी केल्यानंतर केलेल्या दाव्यात म्हटले की, विमानाच्या दिशेत अचानक बदल करण्यात आल्याने ते १८० अंशांच्या कोनात वळले आणि पर्यायी मार्गावर धोका नसल्याची स्पष्ट सूचना करण्यात आली होती.
विमानाचे अपहरण करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणा किंवा अन्य काही उद्देशासाठी वैमानिक जाणीवपूर्वक विमानाचा मार्ग बदलू शकतो, असे मुख्य संशोधक माल्कम ब्रेनेर म्हणाले.
पाच भारतीय नागरिकांसह या विमानात २३९ प्रवाशी होते. अनेक देशांच्या आणि कंपन्यांच्या मदतीने या विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु अभूतपूर्व कोडय़ाचा उलगडा अद्याप शोधपथके करू शकलेली नाहीत.