मलेशियाचे ‘एमएच-३७०’ हे विमान हिंदी महासागरातच कोसळल्याची शक्यता ऑस्ट्रेलियन संशोधकांनी वर्तवली आहे. ज्या क्षणी हे विमान अत्यंत रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाले, त्या ठिकाणाहून म्हणजे दक्षिण भारताकडील समुद्री पट्टय़ातील पाण्याखाली कमी लहरींचे आवाज ऐकू आले. मार्च महिन्यात याचवेळी एक ब्रिटिश महिला बोटीतून कोची ते फुकेत असा प्रवास करत होती. तिनेही आपल्याला आगीने वेढलेले एक विमान समुद्रात दृष्टीस पडल्याचे म्हटले आहे.
संशोधकांना समुद्रातून अत्यंत कमी लहरींचे आवाज ऐकू आले. शक्यता आहे की ते अपघातग्रस्त विमानाचे असावेत, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. ८ मार्च रोजी २३९ प्रवाशांना घेऊन निघालेल्या मलेशिया एअरलाइन्सच्या ‘एमएच-३७०’ या विमानाचा काही वेळातच संपर्क तुटून ते अदृश्य झाले होते.
समुद्राखालून ऐकू येत असलेल्या आवाजाच्या सूक्ष्म लहरींचा ‘ऑडिओ’ प्रसिद्ध केला आहे. हा आवाज कदाचित या विमानाचा असू शकतो, असे पर्थ येथील समुद्रविज्ञान संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधक अलेक डंकन यांनी स्पष्ट केले. अलेक यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन पूर्ण करण्यात आले आहे.
ज्या भागातून सूक्ष्म लहरी आम्ही मुद्रित केल्या, तो बहुतांश भाग हिंदी महासागरातच येतो, असे अलेक म्हणाले.
दरम्या्न, ८ मार्च रोजी ४१ वर्षीय कॅथेरीन टी नावाची महिला आपल्या पतीसोबत कोचीहून फुकेतकडे चालली होती. त्या वेळी समुद्रात आगीने वेढलेले विमान दिसले. त्यांनी नंतर आपल्या बोटीचा माग शोधला तेव्हा ते विमानाच्या प्रस्तावित प्रवास रेषेच्या अगदी नजीक असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या तीन महिन्यांपासून हे विमान बेपत्ता आहे.