मलेशियाचे बेपत्ता झालेले एमएच ३७० हे विमान सापडल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या एका शोध कंपनीने केला असून त्यांना विमानाचा सांगाडा बंगालच्या उपसागरात हिंदी महासागरातील सध्याच्या शोध क्षेत्रापासून पाच हजार कि.मी. अंतरावर सापडला आहे.
 अडलेड येथील जिओ रिझोनन्स या कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी या बेपत्ता विमानाचा शोध ते आठ मार्चला बेपत्ता झाल्यानंतर १० मार्चला सुरू केला. त्यांना बंगालच्या उपसागरात सध्याच्या शोध ठिकाणापासून पाच हजार कि.मी. अंतरावर विमानाचा सांगाडा दिसला, असे स्टार न्यूज पेपरने म्हटले आहे. जिओ रेझोनन्स कंपनीने किमान २० लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठय़ा क्षेत्राचा शोध घेतला त्यासाठी त्यांनी उपग्रहाची छायाचित्र वापरली. कंपनीच्या वैज्ञानिकांनी विमानाच्या शेवटच्या दिशेवर लक्ष केंद्रित करून किमान २० तंत्रज्ञानांचा वापर करून माहिती घेतली असे कंपनीचे प्रवक्ते डेव्हिड पोप यांनी सांगितले.
   त्यांनी असा दावा केला की, अण्वष्टद्धr(२२९ो शोधण्याचे तंत्रज्ञान आम्ही विमान शोधण्यासाठी वापरले. जिओ रेझोनन्स कंपनीने या निष्कर्षांची तुलना ५ मार्च रोजी ते विमान बेपत्ता होण्याच्या तीन दिवस अगोदरच्या छायाचित्रांशी केली असून त्याचा काहीही निष्कर्ष निघालेला नाही, पंरतु हे अवशेष तिथे नव्हते पण ते एमएच ३७० विमानाचेच आहेत याची आम्हाला खात्री पटली आहे, तरीही त्याबाबत अधिक सखोल तपासाची गरज आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
 मलेशियाचे नागरी हवाई वाहतूक खात्याचे महासंचालक अझरुद्दीन अब्दुल रहमान यांनी सांगितले की, विमानाचा सांगाडा सापडल्याच्या वृत्ताबाबत आपल्याला काही माहिती नाहीत. त्या बातम्या व माहिती तपासावी लागेल . जिओ रेझोनन्स कंपनीचे प्रवक्ते पावेल कुरसा यांनी सांगितले की, व्यावसायिक विमानातील अनेक वस्तू बंगालच्या उपसागरात सापडल्या आहेत. बोईंग ७७७ च्या रासायनिक घडणीशी तेथे सापडलेल्या रसायानांची तुलना केली असता त्यात अल्युमिनयम, टिटॅनियम, तांबे, पोलाद संमिश्र हे घटक आढळले आहेत.

कारणे शोधण्यासाठी पथक स्थापन
मलेशियाचे विमान बेपत्ता होण्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी मलेशिया सरकारने आंतरराष्ट्रीय चौकशी पथक नेमले असून त्याच्या प्रमुखपदी मलेशियाचे नागरी हवाई वाहतूक विभागाचे माजी महासंचालक कोक सू चोन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान गेले सात आठवडे चाललेली हवाई पाहणी आता थांबवण्यात आली होती. मलेशियाचे हंगामी वाहतूक मंत्री हिशामुद्दिन हुसेन यांनी सांगितले की, कोक यांची नेमणूक योग्य असून ते कॅनडातील माँट्रियल येथे आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेचे सदस्य होते. त्यांनी सांगितले की, जी समिती नेमण्यात आली आहे त्यात अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रतिनिधी तसेच इंग्लंडच्या हवाई अपघात चौकशी ब्यूरो व चीनच्या अपघात चौकशी विभागाचे सदस्य यांचा समावेश आहे. बोईंग ७७७-२०० विमान ८ मार्चला क्वालालंपूर येथून बीजिंगला जाताना बेपत्ता झाले होते व हिंदी महासागरात कोसळले होते. मलेशियाच्या मते हे विमान मुद्दाम वळवण्यात आले व नंतर ते हिंदी महासागरात कोसळले. आता नेमलेली समिती विमान बेपत्ता होण्याचे कारण शोधून पुढे अशी प्रकरणे टाळण्यासाठी उपाय सुचवणे यासाठी काम करील. बोइंग, रोल्स रॉइस व इनमारसॅट यांना चौकशी पथकात सामील केले आहे. दरम्यान हवाई पाहणी संपल्यानंतर ६०० लष्करी अधिकाऱ्यांनी  पर्थ येथे समूह छायाचित्र काढले.