मलेशियामध्ये एका नवीन प्रकारचा (स्ट्रेनचा) करोना विषाणू आढळून आला आहे. हा विषाणूचा संसर्ग सध्याच्या विषाणूपेक्षा १० पट अधिक वेगाने होत असल्याची माहिती समोर आली आहे. या विषाणूचे नाव डी६१४जी (D614G) असं आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतामधून मलेशियामध्ये परतलेल्या एका हॉटेल मालकाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग झालेल्या काही जणांमध्ये विषाणू आढळून आला आहे. यासंदर्भातील वृत्त ब्लुमबर्गने दिलं आहे.

दोन वेगवेगळ्या कस्टरमधील ४५ करोना रुग्णांपैकी तिघांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. यापैकी एका गटाला भारतामधून परतलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग झाला आहे. या व्यक्तीने १४ दिवस होम क्वारंटाइन होण्याच्या नियमाचे पालन केले नाही. त्याच्या संपर्कात आलेल्या ४५ जणांना करोनाची बाधा झाली. या व्यक्तीला पाच महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याच प्रमाणे फिलिपिन्सवरुन मलेशियामध्ये परतलेल्या काही जणांमध्येही या विषाणूचे अंश आढळून आले आहेत. मलेशियातील आरोग्य खात्याच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या नूर हीशाम अब्दुल्ला यांनी या नवीन विषाणूवर सध्या शोध सुरु असणारी औषधं आणि लस प्रभावी ठरणार नाही अशी शक्यता व्यक्त केली आहे. “लोकांनी अधिक काळजी घेणं गरजेचे आहे. कारण आता मलेशियामध्ये नवीन प्रकारचा करोना विषाणू आढळून आला आहे,” असं अब्दुल्ला यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. “या नवीन विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाची साखळी मोडण्यासाठी जनतेचे सहकार्य खूप महत्वाचे आहे,” असंही अब्दुल्ला यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

जगभरातील इतर देशांपेक्षा करोनावर नियंत्रण मिळवण्यामध्ये मलेशियाला चांगले यश मिळाले असले तरी मागील काही दिवसांपासून येथील करोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. शनिवारी देशामध्ये २६ नवे रुग्ण आढलले. २८ जुलैनंतर पहिल्यांदाच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आलेत. त्यानंतर रविवारी देशात २५ नवे रुग्ण आढळून आले.

करोनाच्या विषाणूमध्ये या पूर्वीही बदल झाल्याचे आढळून आलं आहे. खास करुन युरोप आणि अमेरिकेमध्ये हे प्रामुख्याने दिसून आलं आहे. विषाणूच्या आरएनए (डीएनएप्रमाणेच असणारी जनुकीय रचना) बदल झाल्याचे दिसून आलं होतं. मात्र अशाप्रकारे बदल झाल्याने हा विषाणू अधिक घातक होण्यासंदर्भातील कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. सेल प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार सध्या या बदलांमुळे निर्माण झालेल्या विषणुवर औषधांचा परिणाम होणार नाही असं म्हणता येणार नाही. या विषाणूमुळे औषधांचा प्रभाव कमी असेल असं म्हणणे चुकीचं ठरेल असं या संशोधनामध्ये म्हटलं आहे.