म्यानमार येथून पलायन केलेल्या सात हजार रोहिंगा मुस्लिमांना तात्पुरता आश्रय देण्यास मलेशिया, इंडोनेशियाने संमती दिली. हे सर्व रोहिंग्या मुस्लीम अंदमानच्या समुद्र प्रदेशात अडकले आहेत.   
आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटनांनी हस्तक्षेप करत त्यांची राहण्याची व्यवस्था करेपर्यंत साधारण एक वर्ष लागेल.
या काळात या विस्थापितांना आश्रय दिला जाईल, असे मलेशियाचे विदेश मंत्री अनिफाह अमान यांनी सांगितले. याच वेळी इतर देशांनाही मदतीसाठी बोलावण्यात येणार आहे. यापूर्वी मानव तस्करीविरोधातील होणाऱ्या हालचालींवर चर्चा करण्यासाठी मलेशिया, इंडोनेशिया व थायलंड यांच्यात बैठक झाली होती. यावर मलेशिया, इंडोनेशियामध्ये मुस्लीम समाज जास्त असल्याने त्यांनीच याप्रश्नी पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. या वेळी आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटनांना व समुदायाची संघटना या सर्व विस्थापितांना सर्व समस्या सोडवत पुन्हा आपल्या मायदेशी पाठवतील, असे आश्वासन देण्यात आले. यावर विचार करून दोन्ही देशांनी बुधवारी सहमती दर्शविली.