मलेशिया एअरलाइन्सचे विमान दक्षिण चीनच्या सागरात कोसळल्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी बहुराष्ट्रीय मदतकार्य सुरू झाले. या विमानातील सर्व प्रवासी दगावल्याची भीती असून यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगण्यात आले. या विमानात पाच भारतीय प्रवासी होते.
सहा देशांची विमाने व जहाजे बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत. क्वालालंपूर विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान रडारवरून नाहीसे झाले होते. या विमानाचा सांगाडा अजून सापडलेला नाही. अमेरिकी नौदलाने दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशिका व्हिएतनामच्या दक्षिण किनाऱ्याकडे पाठवली आहे.
मलेशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, खोटी ओळख असलेले चार जण विमानात चढले होते व त्यामुळे दहशतवादी कृत्याची शक्यता फेटाळता येणार नाही. इतर देशांच्या दहशतवादविरोधी संस्थांना त्याबाबत सतर्क करण्यात आले आहे. जेव्हा हे चार प्रवासी संशयास्पद ओळख असताना एमएच ३७० विमानात बसले तेव्हा लाल ध्वज लागले होते, असे सांगण्यात येते. हवामानात काही बिघाड नव्हता. वैमानिकाला संदेश पाठवण्यासाठी वेळ मिळाला नसावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इटालियन व्यक्ती  व ऑस्ट्रियन संरक्षण मंत्री यांच्या हरवलेल्या पासपोर्टच्या आधारे यातील दोन संशयास्पद व्यक्ती विमानात चढल्या, असे हंगामी वाहतूक मंत्री हिशामुद्दीन हुसेन यांनी सांगितले. इटलीचे लुइदी माराल्डी व ऑस्ट्रियाचे ख्रिस्तियन कोझेल यांनी सांगितले की, आमची नावे त्या विमानाच्या प्रवाशात होती पण आमचे पासपोर्ट थायलंडला हरवले व आम्ही मात्र सुरक्षित आहोत. आम्ही सर्व प्रवासी यादीचीच चौकशी करीत आहोत व सर्व शक्यातांचा विचार करीत आहोत, असे हिशामुद्दीन यांनी सांगितले. ज्या इटालियन व ऑस्ट्रियन प्रवाशांचे पासपोर्ट हरवले होते त्यांची नावे प्रवाशांच्या यादीत कशी आली, यावर विचारले असता अझरूद्दीन म्हणाले की, त्याची चौकशी केली जात आहे.
‘आई परत येईल अशी आशा आहे..’
पुणे : मलेशिया एअरलाईन्सचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले, की त्याचे अपहरण झाले याबाबत ठोस अशी काहीच माहिती समोर आलेली नाही. पण, आई सुखरूप परत येईल, अशी आशा या विमानातून प्रवास करणाऱ्या क्रांती प्रल्हाद शिरसाट यांचा मोठा मुलगा राहुल याने व्यक्त केली. राहुल व त्याचा भाऊ पुण्यात भूगाव येथे राहतात. त्यांचे वडील प्रल्हाद शिरसाट हे बीजिंग येथे एका समाजसेवी संस्थेत काम करतात. त्यांना भेटण्यासाठी क्रांती या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाने जात होत्या.
दुर्घटनाग्रस्त विमानातील मुंबईकर कोळेकर कुटुंबियांचा ठावठिकाणा नाही
मुंबई : मलेशिया एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानाने प्रवास करणाऱ्या विनोद कोळेकर यांच्या कुटुंबियांचा अद्याप कोणताही ठावठिकाण न लागल्याने हतबलतेने दूरचित्रवाणीवरूनच या दुर्घटनेची माहिती घेण्याव्यतिरिक्त त्यांच्या बोरीवली येथील शेजाऱ्यांकडे पर्याय राहिलेला नाही.
गेली २५ वर्षे योगीनगर येथील ‘सुखसागर हाऊसिंग सोसायटी’च्या इमारतीत चेतना (वय५५) आणि विनोद (वय५९) हे कोळेकर दांपत्य राहत आहेत. त्यांना संवेद आणि स्वानंद हे दोघे मुलगे आहेत. संवेद बिजिंगमध्ये असतो. तर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेला स्वानंद (२३) मुंबईतच आई-वडिलांसोबत राहतो. संवेदच्या बिजिंग येथे होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी म्हणून हे तिघेजण मुंबईहून निघाले होते. शनिवारपासून बेपत्ता असलेल्या मलेशिया एअरलाइन्सच्या विमान दुर्घटनेत सापडलेल्या पाच भारतीयांमध्ये हे तिघेही आहेत.