News Flash

भारताला धक्का, मालदीवने परत केले ‘गिफ्ट’

मालदीव- चीन- पाकिस्तान या देशांमधील जवळीक वाढत असतानाच ही घटना घडली

प्रतिकात्मक छायाचित्र

भारत आणि मालदीवमधील संबंध तणावपूर्ण असतानाच मालदीवने या तणावात आणखी भर टाकली आहे. भारताने मालदीवला भेट म्हणून दिलेले नौदलाचे एक हेलिकॉप्टर परत करण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. याबाबत भारत सरकार आणि मालदीव सरकारमध्ये अजूनही चर्चा सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मालदीवसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांसाठी भारताने नौदलाचे दोन हेलिकॉप्टर मालदीवला भेट म्हणून दिले होते. यातील एक हेलिकॉप्टर भारताने परत न्यावे, असे मालदीवने म्हटले आहे. याबाबत भारत सरकार आणि मालदीवमधील अब्दुल्ला यामीन सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. मालदीवला ध्रूव अॅडव्हान्स लाइन हेलिकॉप्टरऐवजी डॉर्नियर मेरिटाइम सर्व्हेलन्स एअरक्राफ्ट हवेत, असे सूत्रांनी सांगितले.

भारत – मालदीवमध्ये दुरावा निर्माण झाला असतानाच आणि मालदीव- चीन- पाकिस्तान या देशांमधील जवळीक वाढत असतानाच ही घटना घडली आहे. यामुळे भारत- मालदीवमधील संरक्षण आणि सुरक्षेसंदर्भातील सहकार्यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. चीनने मालदीवमधील हस्तक्षेप वाढवला असून पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीही मालदीवचा दौरा केला. आणीबाणी संपल्यानंतर तिथे जाणारे कमर बाजवा हे पहिले परदेशी पाहुणे होते. भारत मालदीवमधील घटनाक्रमांवर लक्ष ठेवून आहे, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अशांत मालदीव

मालदीवचे लोकशाही पद्धतीने बनलेले पहिले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यावर नव्याने दहशतवादविरोधी खटला चालविण्याचा आदेश देतानाच तेथील सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुटका करण्याचे आदेश फेब्रुवारीमध्ये दिल होते. यामुळे तेथील संसदेत पुन्हा विरोधकांचे संख्याबळ जास्त झाले आणि विरोधकांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर अब्दुल्ला यामीन यांनी ४५ दिवसांची आणीबाणी घोषित केली होती. तेव्हापासून मालदीवमध्ये अशांतता असून यामीन यांनी भारतविरोधी भूमिका घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 11:09 am

Web Title: maldive returns gifted helicopter to india want dornier maritime surveillance aircraft
Next Stories
1 नाराज शिवसेनेसाठी भाजपाकडून मोठी ऑफर; राज्यसभा उपसभापतीपद देणार?
2 दिव्यांग पतीला पाठीवर उचलून CMO कार्यालयात पोहोचली महिला, कारण…
3 सरकारच स्वतः ‘फेक न्यूज’चे सर्वात मोठे गुन्हेगार : अरुण शौरी
Just Now!
X