आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या एका ट्विटमुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. स्वामींनी मालदीवबाबत केलेल्या एका ट्विटमुळे भारताचा जुना सहकारी देश असलेला मालदीव नाराज झाला आहे. संतापलेल्या मालदीव सरकारने भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांना रविवारी समन्स पाठवले. स्वामींचे हे ट्विट चिंताजनक आणि आश्चर्यचकित करणार असल्याचे मालदीवने भारत सरकारला म्हटल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने म्हटले आहे.
https://t.co/nazyiRCOKs: India should invade Maldives if rigging of election takes place
— Subramanian Swamy (@Swamy39) August 24, 2018
जर मालदीवमध्ये निवडणुकीच्या दरम्यान गडबड झाली तर भारताने त्यांच्यावर आक्रमण केले पाहिजे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी दि. २४ ऑगस्ट रोजी केले होते. स्वामी यांच्या या वक्तव्यावर भारत सरकारने टिप्पणी करण्यास नकार दिला होता. स्वामी यांचे ते वैयक्तिक मत आहे. अशावेळी कोणालाही काही बोलण्यापासून रोखता येणार नसल्याचे सरकारने म्हटले होते.
स्वामी यांच्या ट्विटनंतर अनेक मालदीव नागरिकांनी ट्विटरवरच रोष व्यक्त केला होता. भारताने प्रथम आपल्या अडचणी दूर केल्या पाहिजेत. आम्ही कोणालाही हल्ला करण्याची संधी देणार नाही. आम्ही लढू, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही, अशा शब्दांत एका युजरने सुनावले. याला स्वामी यांनी उत्तर दिले. निवडणुकीत गडबड करू नका. आम्ही तुम्हाला १९८८ साली तामिळ दहशतवाद्यांपासून वाचवले होते. त्यावेळी मालदीवमध्ये भारतीय लष्कराला पाठवण्यात आले होते. तेव्हा कोणी आक्षेप नोंदवला नव्हता असे म्हणत मालदीवमध्ये निवडणुकीत जर गडबड झाली तर हा देश इस्लामिक दहशतवादाचा गड बनेल, असेही म्हटले होते.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात आणीबाणी लागू झाल्यापासून भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधात कटुता निर्माण झाली आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने विरोधी नेत्यांना सोडण्याचा दिलेला आदेश यामीन सरकारने मानला नव्हता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही अटक करत विरोधी नेत्यांवर पुन्हा एकदा खटला चालवण्याचे आदेश दिले आणि देशात आणीबाणीची घोषणा केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 11:01 am