मालदीवचे सहावे अध्यक्ष म्हणून अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांचा शपथविधी झाला असून तेथील दोन वर्षांची राजकीय समस्या संपली आहे. हा देश आंतरराष्ट्रीय पातळीवर वाळीत टाकल्याच्या दिशेने वाटचाल करीत होता.
यामीन हे एकाधिकारशाही चालवणारे माजी सत्ताधीश ममून अब्दुल गयूम यांचे सावत्रभाऊ आहेत. त्यांना सरन्यायाधीश अहमद फैझ यांनी पदाची शपथ दिली. त्यांना २१ तोफांची सलामीही देण्यात आली. महंमद जमील यांचा उपाध्यक्ष म्हणून शपथविधी झाला. अध्यक्ष यामीन हे अर्थशास्त्रज्ञ असून ते प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवज या पक्षाचे उमेदवार होते. त्यांनी अनपेक्षितपणे अध्यक्षीय निवडणुकीत विजय खेचून आणला. त्यांना ५१.३९ टक्के मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी माजी अध्यक्ष महंमद नाशीद यांना ४८.६१ टक्के मते मिळाली.
 उद्घाटनाच्या भाषणा यामीन यांनी सांगितले की, आपण मालदीवचे एक पर्यटकप्रेमी ठिकाण म्हणून रक्षण करू. मालदीवला अधिक सुरक्षित व विकसित देश करण्याचा प्रयत्न केला जाईल. शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचाही प्रयत्न केला जाईल. नाशिद व ममून या दोन माजी अध्यक्षांनी शपथविधी समारंभास हजेरी लावली. अध्यक्षीय प्रवक्ते इमाद मासूद यांनी सांगितले की, एकूण ५० सदस्य संसदेच्या खास अधिवेशनास उपस्थित होते. निवडणूक आयुक्त फुआद थोफिक  यांनी सांगितले की, यामीन यांना १११२०३ मते मिळाली तर नाशीद यांना १०५१८१ मते पडली.
फुआद यांच्या मते ९१.४१ टक्के मतदान झाले होते म्हणजे २१८६२१ जणांनी मतदान केले होते.
देशाला स्थिरता हवी आहे व नाशीद यांच्याकडून संसदेत सहकार्य मिळेल अशी अपेक्षा यामीन यांनी व्यक्त केली असून राजकीय नेत्यांनी संघर्ष करण्यापेक्षा देशापुढील मोठय़ा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे.
नाशीद यांनी पराभव स्वीकारला असून देशाला लोकशाही मार्गाने निवडलेला नेता मिळाला असे ते म्हणाले. मालदीव डेमोक्रॅटिक पक्षाने लोकनियुक्त सरकार आणावे असे आवाहन केले होते. आज मालदीवच्या इतिहासातील आनंदाचा दिवस आहे, असेही ते म्हणाले.