मालेमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा सापडल्यानंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी देशात ३० दिवसांसाठी आणीबाणी लागू केली. यामुळे तेथील लष्कराला विशेषाधिकार प्राप्त झाले असून, विविध ठिकाणी छापे टाकण्यात येणार आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून देशात आणीबाणी लागू करण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते मुआझ अली यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालेमध्ये पार्क करण्यात आलेल्या एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा सापडला होता. त्याचबरोबर एका रिसॉर्टमध्येही दारूगोळा सापडला होता. लष्कराने जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांपैकी काही शस्त्रे ही लष्कराच्या कारखान्यातूनच चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. लष्कराच्या कारखान्यातील शस्त्रास्त्रे चोरीला कशी गेली आणि ती सार्वजनिक ठिकाणी कशी काय सापडली, याची चौकशी करण्यात येते आहे.
मालदीवचे उपाध्यक्ष अहमद अदीब यांना गेल्या महिन्यात २५ तारखेला अटक करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष प्रवास करणार असलेल्या बोटीमध्ये स्फोट घडविण्यात आल्यावर या प्रकरणी संशयित म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती.