मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जावर येत्या १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज हे जाहीर केले.  न्या. आर. के. अगरवाल यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाकडून यावर सुनावणी होणार आहे. यामध्ये न्या. मोहन एम. एस. यांचाही समावेश असणार आहे.

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने लेफ्ट. कर्नल पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या जामीन अर्जाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून या प्रकरणी सुनावणी १७ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे.

लेफ्ट. कर्नल पुरोहित यांच्यासोबत साध्वी प्रज्ञासिंह देखील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी आहे. साध्वीला या प्रकरणी जामीन मिळाला असून ती सध्या तुरुंगाबाहेर आहे. सप्टेंबर २००८ मध्ये हा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०१ जण जखमी झाले होते.