मालीची राजधानी असलेल्या बामको शहरात नाइट क्लबमध्ये चेहरा झाकून आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात पाचजण ठार झाले. त्यात एका फ्रेंच व एका बेल्जियम नागरिकाचा समावेश आहे.
फ्रान्स व बेल्जियम यांनी ला टेरासी या रेस्तराँमध्ये व बामको येथील बारमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या नागरिकांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगितले. बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री डिडियर रेंडर्स यांनी या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा आपण निषेध करतो असे सांगितले, तर फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री लॉरेंट फॅबियस यांनी या गुन्ह्य़ास जबाबदार असलेल्यांना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या मालीतील स्थायी दूतावासाने म्हटले आहे की, चेहरा झाकलेल्या एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली हा हल्ला करण्यात आला. त्यात नऊजण जखमी झाले आहेत. स्वीस संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, दोनजण स्वीस सैनिक होते.
 दोन हल्लेखोर नाइट क्लबवर हल्ला करून दुसऱ्या एका साथीदाराच्या मोटारीतून पळाले.  पोलिसांच्या मोटारीचा चालक व एक पादचारी यात ठार झाला. तसेच एका घराचा खासगी रक्षकही मरण पावला, असे हमादू डोलो या व्यक्तीने सांगितले. ला टेरासी हे बामकोच्या शेजारी असलेल्या हिप्पोड्रोम येथे असून तेथील नाइट क्लब लोकप्रिय आहे. तेथे शुक्रवारी लोक सालसा नृत्यासाठी आले होते. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस ऑलाँद यांनी सांगितले की, या हल्ल्यात पाचजण ठार झाले आहेत.