पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या आईच्या मृत्यूनंतर तिला श्रद्धांजली वाहिली नाही. त्यावरून त्यांची द्वेषाची मानसिकता दिसून येते, अशा शब्दात नृत्यांगना मल्लिका साराभाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मल्लिका यांच्या आई व प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी यांचे गुरुवारी निधन झाले.
तुम्ही माझ्या राजकारणाचा द्वेष करता, मी तुमच्या विचारांचा विरोध करते. मात्र माझ्या आईने कलेद्वारे देशाच्या संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यात योगदान दिले. त्यात राजकारण आणता कामा नये, असे मल्लिका यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटले आहे.
सहा दशके माझ्या आईने जगात भारतीय संस्कृतीचा प्रचार केला असे असताना तुम्ही सहवेदनाही व्यक्त करू नये. माझा विरोध करीत असलात तरी आईच्या योगदानाची दखल घ्यावीशी वाटलीही नाही याची खंत वाटते , अशा कठोर शब्दांत मोदींची निर्भर्त्सना केली आहे.