भारत २०२२ पर्यंत कुपोषणमुक्त होईल असा विश्वास केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी राज्यसभेत त्यांनी कुपोषणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सरकारची भुमिका मांडली.

इराणी म्हणाल्या, भारताला कुपोषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात येणारी ‘पोषण अभियान’ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ही योजना उत्कृष्ट पद्धतीने राबवली जात असून पुढील दोन वर्षात एकही मुल कुपोषणग्रस्त राहणार नाही. या अभियानाचे निश्चित करण्यात आलेले टार्गेट भारत २०२२ पर्यंत पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यसभेत आम आदमी पार्टीचे खासदार सुशीलकुमार गुप्ता यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, जेव्हा आपण कुपोषणाच्या समस्येबाबत बोलतो तेव्हा आपल्याला स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर गोष्टींचाही विचार करायला हवा. त्याचबरोबर मला हे सांगताना आनंद होत आहे की, सप्टेंबर २०१८ मध्ये ‘कुपोषण महाकाल’मध्ये २५,००० हजार लोकांनी सहभाग नोंदवला होता. तर ८ ते २२ मार्च दरम्यान झालेल्या ‘पोषण पकवाया’ महोत्सवात ४४.८८ कोटी लोकांनी सहभाग नोंदवून याला लोक चळवळीचे स्वरुप दिले.

‘पोषण अभियान’ योजना प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवली जात आहे. ९ जून रोजी हरयाणामध्ये मी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत या योजनेबाबतची आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर सर्व केंद्रीय मंत्र्यांना देशभरात या योजनेच्या सक्षमीकरणासाठी आणि जनजागृतीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. २०२२ पर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्यासाठी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या ‘मिड डे मिल’ योजनेवरही केंद्र सरकारकडून लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे यावेळी इराणी यांनी सांगितले.

‘पोषण अभियान जनआंदोलन’ हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असून बालके, किशोरवयीन मुले, गर्भवती महिला यांच्यातील पोषणाची पातळी वाढावी हा याचा हेतू आहे.