दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. 1 डिसेंबर रोजी ही आत्महत्या करण्यात आली. मुलीच्या आईने आत्महत्येसाठी शाळेतील शिक्षकांना जबाबदार ठरवलं आहे. ‘माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मित्रांनी मला सांगितलं की, शाळेतील दोन शिक्षक संपूर्ण वर्गासमोर तिला चारित्र्यहीन म्हणाले होते. ज्यामुळे ती दुखी होती’, अशी माहिती मुलीच्या आईने दिली आहे.

‘मुलीने 1 डिसेंबरला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली’, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त समीर शर्मा यांनी दिली आहे. 12 वर्षीय मुलीचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मुलीने मृत्यूपुर्वी आपल्या हातावर ‘आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे…मी हे जग सोडून जात आहे’, असं लिहिलं असल्याचं समीर शर्मा यांनी सांगितलं आहे.

शिक्षक ओरडल्यामुळे मुलगी खूप नाराज होती असं तिच्या आईने सांगितलं आहे. मुलीच्या आईने केलेल्या आरोपांची आम्ही पडताळणी करत आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीची आई तीस हजारी न्यायालयात वकील असून तिथेच त्यांनी शेवटचं आपल्या मुलीला पाहिलं होतं.

दुपारी चार वाजता घरी आल्या असता त्यांनी मुलीचा मृतदेह पाहिला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागली आहे. ‘माझ्या मुलीने एकच शिक्षक रोज आपल्यावर ओरडत असल्याचं सांगितलं होतं. याच शिक्षकाने शुक्रवारीदेखील बायोलॉजी लॅबमध्ये इतर शिक्षकांसमोर तिचा अपमान केला होता’, असंही मुलीच्या आईने सांगितलं आहे.

यानंतर आपली मुलगी शाळेच्या बाथरुममध्ये जाऊन रडत होती असं त्यांनी सांगितलं आहे. ‘ती मला वारंवार शाळा बदलण्याचा आग्रह करत होती. पण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे याची मला कल्पना नव्हती. ती आत्महत्या करेल असं अजिबात वाटलं नव्हतं’, असं महिलने सांगितलं आहे.

’20 डिसेंबरला तिच्या वाढदिवसाला मी तिला बाहेर घेऊन जाणार होते. पण ती आम्हाला सोडून गेली. मी शाळा बदलायला हवी होती’, अशी खंत महिलेने व्यक्त केली आहे. दरम्यान शाळा प्रशासनाने चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे. ही समिती दिल्ली पोलिसांकडे अहवाल सोपवणार आहे.