केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत…यातून त्यांचे संस्कार दिसतात’, अशा शब्दात इराणींनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.

“मला हे ऐकून धक्काच बसला की, महामारीसाठी त्या मोदीजी आणि अमित शाह यांना जबाबदार ठरवत आहेत. पण हेच ममता बॅनर्जी यांचे संस्कार आहेत. मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी म्हणून करतात आणि त्या आमच्या नेत्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्दांचा वापर करतात”, अशा शब्दात इराणी यांनी ममता यांच्यावर टीका केली.

आणखी वाचा- West Bengal: “नरेंद्र मोदींवर बंदी का नाही?,” प्रचारबंदी घालणाऱ्या निवडणूक आयोगाला ममता बॅनर्जींचा सवाल

काल(दि.१४) जलपैगुडी येथील सभेत बोलताना, “जेव्हा करोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हा मोदी आणि शाह आले नाहीत. पण आता त्यांनी इथे बाहेरून लोकांना आणलंय व करोना वाढायला लागल्यावर पळून जात आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने उपऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणले आणि त्यामुळेच राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असं त्या म्हणाल्या. “इतके दिवस तुम्हे कुठे होतात? तुम्ही करोना आणलात आणि पळून गेलात. आम्ही सर्व काही ठीक केलं होतं. जर त्यांनी सर्व लोकांचं वेळेत लसीकरण केलं असतं तर करोनाचे नवे रुग्ण आढळले नसते,” असं ममता बॅनर्जी यांनी भाजपाचं नाव न घेता म्हटलं. “तुम्हाला माहिती आहे का त्यांनी राज्यात अनेक लोकांना आणलं. निवडणुकीच्या नावाखाली त्यांनी अनेक उपऱ्यांना आणलं आणि आजार पसरवून पळ काढला. आणि आता आम्हाला मत द्या सांगत आहेत,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. “करोना सध्या कोणालाही कधीही होऊ शकतो. लोकांना योग्य उपचार मिळायला हवेत. पण गेल्यावेळी जेव्हा येथे करोना होता तेव्हा कोणी आलं नाही. आता मात्र सगळे निवडणुकीसाठी येत आहेत,”अशी टीका ममता यांनी केली होती.