नोटाबंदीवरून मोदी सरकारला आणखी घेरण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्राच्या या निर्णयाविरोधात इतर विरोधी पक्षांनीही रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. मी १२.३० वाजता जंतर-मंतरवर आंदोलन करणार आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी इतर विरोधी पक्षांनीही रस्त्यावर येण्याचे मी अपील करते. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य लोकांसमोरील अडचणीत मोठी वाढ झाली आहे, असे त्या म्हणाल्या.
दुसरे पक्ष त्यांच्याबरोबर येतील का असा सवाल त्यांना केल्यानंतर त्या म्हणाल्या, जर एखादा पक्ष आमच्याबरोबर येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. संसदेत आम्ही सर्वजण एकत्रित काम करत आहोत.

उद्या जेव्हा मी दिल्लीत असेन. तेव्हा तृणमूल काँग्रेस नोटाबंदीविरोधात कोलकाताच्या रस्त्यावर उतरेल. इतर पक्षांनीही विरोध नोंदवण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार यावेत असे आवाहन करत हा सामान्य लोकांशी निगडीत मुद्दा असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

निश्चलनीकरणाच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या इतर पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी धमकावत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला होता. लोकांना प्रचंड त्रास सहन कराव्या लागणाऱ्या केंद्राच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आपण मंगळवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला. नोटाबंदीनंतर देशभरात बँकांसमोरील रांगांमध्ये जवळपास ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. आजच्या घडीला देशभरातील लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर त्यांच्याकडे जेवण, औषधे आणि दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही पैसे राहिले नाहीत, असेही निरुपम म्हणाले.