पश्चिम बंगालची राजधानी कोलकातातील पुराणबस्तीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांशी बोलण्यासाठी अचानक थांबल्या. त्यांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्या समस्या जाणून घेत असताना त्यांना इथे चारशे कुटुंबांसाठी केवळ दोनच शौचालये असल्याचे कळाले आणि ममता भडकल्या. रागातच त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांना फैलावर घेतले.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांना अवकाश असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनसंपर्काचे काम सुरू केल्याचे दिसत आहे. सोमवारी प्रशासकीय बैठकीसाठी निघालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी झोपडपट्टी असलेल्या पुराणबस्तीजवळ थांबल्या. त्यांनी लोकांशी चर्चा केली. यावेळी लोकांशी आपल्या अडचणी सांगितल्या. त्यात एक अडचण होती, चारशे कुटुंबांसाठी दोन शौचालये आणि दोनच बाथरूम. हे ऐकून ममता यांचा रागाचा पारा चढला. त्यांनी लागलीच ग्रामविकास आणि महानगरपालिका व्यवहार मंत्री फिरहाद हकीम यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

मी आता बघून आले. चारशे कुटुंबांना दोन शौचालये आणि दोनच बाथरूम कशामुळे? आपण झोपडपट्टी विकासासाठी पैसे दिले. तिथला नगरसेवक कोण आहे. तो काय करतोय, अशी विचारणा त्यांनी हकीम यांच्याकडे केली. त्यानंतर एकाने नगरसेवकाला अटक झाली असल्याची माहिती ममतांना दिली. त्यावर ममता आणखी भडकल्या नगरसेवकाला अटक झाली तर काय झाले, महापालिका कशासाठी आहे. तुम्ही वार्डाची पाहणी का केली नाही, असा सवाल करीत सात दिवसात सर्व झोपडपट्ट्यांची पाहणी करून त्यांच्या समस्या समजून घ्या आणि त्या सोडवा, असे आदेश ममता बॅनर्जी यांनी दिले. हावरा महानगर पालिकेच्या निवडणुका अद्याप प्रलंबित असल्याने मनपाचा कारभार प्रशासकांच्यामार्फत सुरू आहे.