News Flash

भाजपविरोधात ममतांची मोर्चेबांधणी

भाजपमधील नाराज नेत्यांच्या भेटीगाठी

दिल्लीत दिवसभर विरोधी पक्ष आणि भाजपमधील नाराज नेत्यांच्या भेटीगाठी

तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादीवरून मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या ममतांनी बुधवारी संसदेतच ठिय्या दिला होता.

विरोधी पक्ष नेते आणि खासदार तसेच, भाजपमधील नाराज नेत्यांची त्यांनी भेट घेतली. भाजप आणि मोदी सरकारविरोधात विरोधकांना एकत्रित करण्याचा पुढील टप्प्यासाठी ममतांनी प्रयत्न सुरू केल्याचे मानले जाते. त्याचाच भाग म्हणून १९ जानेवारी रोजी कोलकात्यात जंगी जाहीर सभेचे आयोजन तृणमूल काँग्रेसने केले असून त्याचे निमंत्रण देण्यासाठी विविध पक्षनेत्यांची भेट घेतल्याचे ममतांनी पत्रकारांना सांगितले.

ममतांनी सकाळी संसदेत आल्यावर ‘बाजूला करण्यात आलेले’ भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची ममतांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. ‘दिल्लीत आल्यावर आपण नेहमीच अडवाणींची भेट घेतो’, असे ममता या भेटीनंतर म्हणाल्या.

भाजपमधील नाराज आणि मोदीविरोधक यशवंत सिन्हा, जेठमलानी आणि शत्रुघ्न सिन्हा यांचीही ममतांनी मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली होती.

एकत्र लढू!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांचीही ममतांनी १० जनपथवर जाऊन भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रित लढण्याचे आवाहन ममतांनी दोन्ही नेत्यांना केले. ममतांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांनाही जाहीर सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. सपाचे नेते रामगोपाल यादव, खासदार जया बच्चन, तेलुगु देसम तसेच अण्णा द्रमुकचे नेते, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आदींशीही ममतांनी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही मंगळवारी ममतांनी भेट घेऊन वीस मिनिटे संवाद साधला.

निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा विचार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाचा आग्रह सोडल्यानंतर मायावती आणि ममतांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. यासंदर्भात, भाजपला हरवणे हे प्रथम लक्ष्य आहे. विरोधकांपैकी पंतप्रधान कोण होणार हे लोकसभा निवडणुकीनंतरच निश्चित केले जाईल, असे ममतांनी पत्रकारांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 1:15 am

Web Title: mamata banerjee bjp
Next Stories
1 ‘डोकलाम’चा वाद राजनैतिक परिपक्वतेने संपुष्टात
2 उड्डाणानंतर विमान कोसळून ९७ जखमी
3 देशात २७७ बोगस अभियांत्रिकी महाविद्यालये
Just Now!
X