ममता बॅनर्जी यांचा आरोप, केंद्रीय संस्था आणि पैशांचा गैरवापर

लोकसभा निवडणुकीतील भाजपचे यश हे एक रहस्य असून या पक्षाने केवळ पश्चिम बंगालमध्येच नव्हे, तर देशभर ईव्हीएममध्ये (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) फेरफार करण्याबरोबरच निवडणूकजिंकण्यासाठी केंद्रीय संस्था आणि पैशांचा गैरवापर केला, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केला.

शहीद दिनानिमित्त कोलकात्यात आयोजित केलेल्या तृणमूल काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना बॅनर्जी यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. ‘‘केंद्रातील सत्ताधारी पक्षाने देशभर घोडेबाजार भरवला आहे. भाजप तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना पैसा आणि इतर प्रलोभने दाखवत आहे. आमदारांना पक्षांतरासाठी दोन कोटी रुपये आणि एक पेट्रोल पंप देऊ करत आहे,’’ असा आरोप बॅनर्जी यांनी केला.

कर्नाटकातील राजकीय तिढय़ाचा उल्लेख करून ममता म्हणाल्या, ‘‘कर्नाटकसह राजस्थान, मध्य प्रदेशमधील सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. कर्नाटकप्रमाणेच भाजपने देशभर घोडेबाजार भरवला असून ‘कर्नाटक मॉडेल’ पश्चिम बंगालमध्ये राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.’’ भाजपमध्ये सामील व्हा, अन्यथा तुम्हाला चिट फंड गैरव्यवहारात अडकवून तुरुंगात पाठवू, अशा धमक्या केंद्रीय संस्था तृणमूल काँग्रेसचे नेते आणि लोकप्रतिनिधींना देत असल्याचा आरोपही ममता यांनी केला. भाजपने अशा प्रकारचे राजकारण केले तर एक दिवस त्या पक्षाचा कणा मोडेल आणि तो पुन्हा उभा राहू शकणार नाही, असा टोलाही ममता यांनी लगावला.

विधेयके मध्यरात्री तयार केली जातात आणि सकाळी संसदेत मांडली जातात. कुणाशीही चर्चा केली जात नाही वा सल्ला घेतला जात नाही. संघराज्य रचनाच उद्ध्वस्त केली जात आहे. संसदेचे कामकाज केवळ विरोधी पक्षांमुळे सुरू आहे, अशी टिप्पणी ममता यांनी केली.

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबाबत शंका उपस्थित करून भाजपचे हे यश म्हणजे एक प्रकारचे गूढ असल्याची टीका ममता यांनी केली. निवडणुकीत ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार करण्यात आले. त्यामुळे पुन्हा मतपत्रिकांद्वारे निवडणूक घ्यावी, अशी आमची मागणी आहे. कोणत्याही प्रगत देशांमध्ये ‘ईव्हीएम’चा वापर केला जात नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भाजपने निवडणूकजिंकण्यासाठी पैसा आणि केंद्रीय संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. महागाई वाढत असल्याने हे सरकार दोन वर्षे तरी टिकेल की नाही, याबद्दल आपल्याला शंका असल्याचा टोलाही ममता यांनी लगावला. धार्मिक श्रद्धांच्या आधारावर भाजप हिंदू आणि मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

निवडणुकीसाठी पैसा कोठून आणला?

निश्चलनीकरणातून भाजपने मिळवलेला काळा पैसा परत करावा, या मागणीसाठी तृणमूल काँग्रेस २६ जुलैला आंदोलनाची घोषणा करणार असल्याचेही ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. भाजपने परदेशातून किती पैसा मिळवला, निवडणूक खर्चासाठी त्यांनी पैसा कोठून आणला, असे प्रश्नही ममता यांनी उपस्थित केले. प. बंगालमध्येही उज्ज्वला योजनेत भाजपच्या नेत्यांनी गैरव्यवहार केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपचे प्रत्युत्तर

भाजपने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे आरोप साफ फेटाळून लावले. तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी कथित धमकी देणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचे नाव ममता यांनी जाहीर करावे, असे आव्हान भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिले. कुठल्याही अधिकाऱ्याचे नाव सांगण्यास त्या असमर्थ असतील, तर त्यांनी असे निराधार आरोप करणे टाळावे, असे म्हणाले. भाजप तृणमूलच्या आमदारांना दोन कोटी रुपये व पेट्रोल पंप देण्याचे प्रलोभन दाखवत आहे या ममता यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना, त्यांच्यापैकी कुणाचीही, अगदी मुख्यमंत्र्यांचीही एवढी मोठी ‘मार्केट व्हॅल्यू’ नाही, असा टोला घोष यांनी लगावला.