ममता बॅनर्जी यांचा घणाघाती आरोप

कोलकाता  : प्रसिद्ध बंगाली अभिनेते व माजी खासदार तपस पॉल यांच्या मृत्यूस केंद्रीय संस्थांचा दबाव व केंद्र सरकारचे सुडाचे राजकारण जबाबदार आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

पॉल हे दोन वेळा खासदार होते व वयाच्या ६१ व्या वर्षी मुंबईत त्यांचे हृदयविकाराने मंगळवारी निधन झाले. रोझ व्हॅली चिटफंड प्रकरणात पॉल हे आरोपी होते. एक वर्ष त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. पॉल यांना श्रद्धांजली वाहताना बॅनर्जी यांनी सांगितले की, २०१७ मधील नारद टेप प्रकरणात आरोपी असलेले तृणमूलचे नेते सुलतान अहमद यांचा अशाच ताणामुळे हृदयविकाराने मृत्यू झाला होता. अहमद हे माजी मंत्री होते व ते त्याच वर्षी मरण पावले होते.

खासदार प्रसून बॅनर्जी यांच्या पत्नीही केंद्राच्या सुडाच्या राजकारणात बळी पडल्या असा आरोप ममता यांनी केला. प्रसून बॅनर्जी यांचे नाव नारद टेप प्रकरणात आले होते. त्यांचे सीबीआय व सक्तवसुली संचालनालय यांनी जाबजबाब घेतले होते. रबींद्र भवन येथे तपस पॉल यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असताना ममता बॅनर्जी यांनी वार्ताहरांना सांगितले की, तपस यांचा अकाली मृत्यू झाला. केंद्रीय संस्थांनी मानसिक छळ केल्याने त्यांचा मृत्यू झाला असून  रोझ व्हॅलीचे ते  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होते, पण अनेक कलाकार असे ब्रँड अँबेसेडर असतात. पण म्हणून पॉल यांची अशी काय चूक होती ज्यासाठी त्यांना एक वर्ष तुरुंगात टाकण्यात आले. हे बरोबर नाही. हा राजकीय सुडाचा प्रकार होता. चित्रपट निर्माते श्रीकांत मोहता व एका पत्रकाराचाही अशाच प्रकारे छळ करण्यात आला.