पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवावी असे त्यांनी म्हटले आहे. मोदींनी हा निर्णय घेतला तर नोटाबंदीप्रमाणे त्यांचे हे पाऊल अपयशी ठरेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

पत्रकारांनी मोदी यांच्याशी संबंधित प्रश्न विचारल्यानंतर ममता बॅनर्जींनी हे उत्तर दिले. कोणीही कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मी पण वाराणसी मतदारसंघातून लढू शकते. पण जर ते बंगालमधून लढले तर त्यांची अवस्था नोटाबंदीसारखी होईल. त्यांना जनतेच्या न्यायालयात दंडित केले जाईल.

त्या म्हणाल्या, मला माहीत आहे की, त्यांनी देशाचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना लोकांना उत्तर द्वावे लागेल. त्यांनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढल्यास आम्हाला खूप आनंद होईल. जर त्यांना एका मतदारसंघाची भीती वाटत असेल तर त्यांनी सर्वच ४२ जागांवरुन निवडणूक लढवावी.

बंगालचे मतदान केंद्र अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी येथून निवडणूक लढवावी. त्यांनी येताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारख्या आपल्या राजकीय सेनांनाही येथे आणावे. त्यांनी येथे येऊन भोजन आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा. जनता त्यांना निरोप देईन, असा टोलाही लगावला.