19 September 2020

News Flash

महामेळाव्यामुळे तृणमूल सरकार लक्ष्य

ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकत्यात सोमवारी आंदोलनस्थळीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली.

ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षांनी घेतलेल्या महामेळाव्यामुळे केंद्र सरकार जाणीवपूर्वक आमच्या सरकारला लक्ष्य करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवल यांना ‘कुछ तो करो’ असे आदेश दिले आणि त्यानंतर दोवल यांच्या आदेशानुसार सीबीआयचे अधिकारी काम करीत असल्याचा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

शारदा चिट फंड घोटाळ्याच्या प्रकरणात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्या चौकशीसाठी धडकलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाच बंगाल पोलिसांनी ताब्यात घेतले आणि स्थानबद्ध करून रात्री उशिरा त्यांची सुटका केली, त्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे.

अजित दोवल हे मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत. दोवल यांच्या आदेशानुसारच सीबीआयचे अधिकारी कारवाई करतात, महामेळावा आयोजित केल्यानेच ते बळजबरीने राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोलकाता पोलीस आयुक्त राजीवकुमार जगातील सर्वोत्तम अधिकारी आहेत, असे ममता म्हणाल्या.

कोणत्याही परवानगीविना सीबीआयने पश्चिम बंगालमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, एखाद्या पोलीस आयुक्ताच्या घरी तुम्ही वॉरण्ट नसताना कसे जाऊ शकता, आपल्या अधिकाऱ्यांचा बचाव करणे आपले कर्तव्य आहे, भाजप चोर पक्ष आहे, शारदा चिट फंड घोटाळ्याच्या प्रकरणात आवश्यक ती कारवाई आम्ही करीत आहोत, असेही त्या म्हणाल्या.

‘तपास यंत्रणेचा हत्यार म्हणून वापर’

भुवनेश्वर : केंद्र सरकार सीबीआयचा गैरवापर करीत असल्याच्या मुद्दय़ावरून ओदिशातील सत्तारूढ बीजेडी आणि विरोधी काँग्रेसने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मध्यवर्ती तपास यंत्रणेचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात आहे, असेही बीजेडी आणि काँग्रेसने म्हटले आहे.

‘भाजपला पराभवाची भीती’

लखनऊ : भाजपला कोणत्याही स्थितीत आपल्याच हाती सत्ता कायम ठेवायची आहे, निवडणुकीत पराभव पत्करावा लागण्याची त्यांना धास्ती वाटत आहे आणि त्यासाठी भाजप सीबीआयचा ‘निवडणूक हस्तक’ म्हणून वापर करीत आहे, असा आरोप सपाचे नेते अखिलेश यादव यांनी रविवारी ट्वीटद्वारे केला आहे.

स्टॅलिन यांचा ममता यांना पाठिंबा

लोकशाही वाचविण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लढा देत असून त्या लढय़ास द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी पाठिंबा दर्शविला आहे. फॅसिस्ट भाजप सरकारच्या राजवटीमध्ये प्रत्येक संस्थेच्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यात आली आहे, असे स्टॅलिन यांनी रविवारी रात्री ट्वीट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 1:34 am

Web Title: mamata banerjee comment on cbi and narendra modi
Next Stories
1 निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही होऊ शकते – नितीशकुमार
2 शारदा चिटफंड घोटाळा – सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी
3 प्रत्यार्पणास मंजुरी पण विजय मल्ल्या म्हणतो, कोर्टात अपील करणार
Just Now!
X