विरोधकांच्या एकजुटीवर सोनिया गांधींशी चर्चा

नवी दिल्ली : भाजपचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पहिजे, असे सांगत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली दौऱ्याचा हेतू स्पष्ट केला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांनी बुधवारी भेट घेतल्यानंतर, विरोधी पक्षांच्या एकजुटीवर चर्चा झाल्याचे ममतांनी सांगितले.

सोनिया-ममता भेटीनंतर काँग्रेस तृणमूल काँग्रेस पेगॅसस प्रकरणावर संसदेत सत्ताधारी पक्षाविरोधात एकत्रितपणे संघर्ष करण्याची शक्यता दिसू लागली आहे. पेगॅसस प्रकरणावर दोन्ही पक्ष संसदेत आक्रमक झाले असले तरी ते स्वतंत्रपणे घोषणाबाजी करत आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही तृणमूल काँग्रेसचा समावेश नव्हता. इंधन दरवाढ, शेती कायदे या मुद्दय़ांवरही संसदेत तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला सहकार्य केलेले नाही. मात्र, पेगॅससच्या मुद्दय़ावर कोणाशीही मतभेद नाहीत, तृणमूल काँग्रेस तसेच, अन्य विरोधी पक्ष एकत्रितपणे केंद्र सरकारविरोधात लढत आहोत, असे राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पेगॅसस प्रकरणावर संसदेत चर्चा झाली पाहिजे व सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीही झाली पाहिजे, असे ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधींच्या ४५ मिनिटांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. या बैठकीला राहुल गांधीदेखील उपस्थित होते.

भाजपविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात ‘राष्ट्रमंच’सारख्या बिगर राजकीय मंचावर चर्चा केली जात असली तरी, या प्रयत्नांना ठोस स्वरूप प्राप्त झालेले नाही. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या संभाव्य महाआघाडीच्या नेतृत्वासंदर्भात ममता म्हणाल्या की, मी राजकीय ज्योतिषी नाही, राजकीय परिस्थितीवर नेतृत्व अवलंबून असेल. भाजपविरोधात अन्य कोणीही नेतृत्व केले तरी माझी हरकत नाही. नेतृत्व कोणावर थोपवता येत नाही, वेळ येईल तेव्हा या मुद्दय़ावर चर्चा केली जाईल! मला नेता बनण्याची इच्छा नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी कार्यकर्ता म्हणून विरोधी पक्षांना मदत करण्याची माझी तयारी आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममतांच्या या विधानामुळे विरोधकांच्या आघाडीबाबत लवचीक धोरण स्वीकारण्याचे संकेत दिल्याचे मानले जाते.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन या नेत्यांशीही माझा संवाद असतो, असेही ममता म्हणाल्या. वायएसआर काँग्रेस वा बिजू जनता दल हे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये नसले तरी ते विरोधी पक्षांमध्येही सहभागी झालेले नाहीत.

शरद पवार यांचीही लवकरच भेट

संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी समान व्यासपीठ निर्माण केले जाऊ शकते. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करणार असल्याचेही ममतांनी सांगितले. पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते कमलनाथ, आनंद शर्मा आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.