देशातील सध्याच्या आर्थिक मंदीवरून विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका होत असताना, आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर्थिक मंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींना तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला दिला आहे.

” निर्गुंतवणूक हा काही तोडगा नाही. यामुळे आर्थिक संकट आणखी वाढेल. मला वाटतं पंतप्रधानांनी तज्ज्ञांशी चर्चा करावी. गरज पडल्यास त्यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावायला हवी, कारण हा देश सर्वांचा आहे.” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय धोरणात बदल केला असल्याचे यावरून दिसून येत आहे. तसेच, आगामी निवडणुकीत भाजपाशी मुकाबला करण्यासाठी तृणमूल काँग्रेस आपली दिशा बदलण्याच्या प्रयत्नात असल्याचेही दिसत आहे

मानव निर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या सर्व परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली होती. देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत आहे. मागील तिमाहीतील विकासदर (जीडीपी) 5 टक्क्यांवर आला आहे. हे आपण मंदीकडे जात असल्याचे निदर्शक आहेत. विकास करण्याची प्रचंड क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत असताना मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हे आर्थिक आरिष्ट ओढवले आहे, असेही मनमोहन सिंग यांनी म्हटले होते.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी देखील आर्थिक मंदीवरुन केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली होती.अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असल्याचे सरकारने मान्य करायला हवे असे, त्यांनी ट्विटद्वारे मंदीबाबत भाष्य केले होते. “कोणतंही खोटं शंभरवेळा सांगितल्याने ते खरं होत नाही. भाजपा सरकारला आता हे मान्य करायला हवे की, अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असून त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपायांवर काम करणे गरजेचे आहे. मंदीचे परिणाम सर्वांसमोर आहेत, त्यामुळे सरकार कधीपर्यंत हेडलाइन मॅनेजमेंटने काम चालवणार आहे.” असेही प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या.