राज्यात विकासकामे राबवण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. यासाठी माझ्या विरोधकांनी भले कितीही मोठा कट रचला असला तरी त्याचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे नाव न घेता शरसंधान साधले.
सध्या आमच्या विरोधात कट रचला जात आहे, करा तुम्हाला, जे काही करायचे आहे ते. पण याद राखा, तुमचा कोणताही कट आम्हाला राज्यातील विकासकामांच्या अंमलबजावणीपासून रोखू शकणार नाही, अशी गर्जना त्यांनी या वेळी केली. २४ परगणा जिल्ह्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत बॅनर्जी बोलत होत्या. शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला आहे. यामागे केंद्र सरकारचा हात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
आम्ही लोकांच्या कल्याणाची कामे करीत आहोत, त्यामुळे कोणताही कट रचून त्यांना (भाजप) त्यात यश लाभणार नाही, असा टोला ममता यांनी लगावला. राज्यातील आर्थिकदृष्टय़ा घटकांना किफायतशीर दरात औषधे मिळावीत यासाठी पहिल्याच माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्याची योजना आम्ही रावबली. यात ७८ टक्क्यांपर्यंत औषध खरेदीवर सवलत दिली जाते, असे त्यांनी सांगितले.
कुणाल घोष यांचा आरोप
शारदा चिट फंड घोटाळ्यातील ‘सर्वात मोठय़ा लाभार्थी’ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आहेत; परंतु चोर सोडून संन्याशाला सुळावर दिले जात आहे. या घोटाळ्याची जबाबदारी घेण्याची ममता यांची तयारी नसून त्या भित्र्या आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी सोमवारी येथे केला.
ममता बॅनर्जी ‘शारदा’ घोटाळ्यातील सर्वात मोठय़ा लाभार्थी आहेत, परंतु या साऱ्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या सभा भरवत आहेत, असे घोष यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे.
प्रेसिडेन्सी कारागृहातून बंकशाल न्यायालयात आणल्यानंतर घोष यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा पडला. या वेळी त्यांनी ममता यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले की, ममता भित्र्या आहेत. यासाठी त्यांना माझ्यासमोर बसवा आणि त्यांची चौकशी करा, मग खरे काय बाहेर येईल. या वेळी सीबीआयच्या वतीने याप्रकरणी संयुक्त चौकशीची मागणीचा पुनरुच्चार केला.