नोटाबंदीवरुन आक्रमक झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात टीका केली आहे. मी जीवंत राहो किंवा मरो, पण मी नरेंद्र मोदींना भारताच्या राजकारणातून हद्दपार करणारच अशी शपथच ममता बॅनर्जींनी घेतली आहे.

कोलकातामध्ये सोमवारी नोटाबंदीविरोधात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. मी आज सर्वंसमक्ष शपथ घेते. मी मोदींना राजकारणातून हद्दपार करणार असे बॅनर्जींनी सांगितले. मोदींनी स्वतःला देव समजून नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यांनी कोणालाही विचारले नाही की पाचशे आणि हजारच्या नोटा कोण वापरतं,त्यांनी थेट नोटाबंदीचा निर्णय घेतला अशी टीका ममतादीदींनी केली. बाजारपेठ, चित्रपटगृह, नाट्यगृह अशा प्रत्येक ठिकाणी नोटाबंदीचा फटका बसत आहे. पण मोदींना सर्वसामान्य जनतेची चिंता नाही असे त्यांनी नमूद केले.

नोटाबंदीविरोधातील आंदोलन आणखी आक्रमक करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. नोटाबंदीचा निर्णय मागे घेतला नाही तर मोदींना सत्तेतून जावे लागेल. आता मोदींच्या निवासस्थानाबाहेर नोटाबंदीविरोधात आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला.  संपूर्ण देश नोटाबंदीमुळे होरपळून निघत आहे. बँक आणि एटीएममध्ये पैसे नाही. आत्तापर्यंत नोटाबंदीच्या निर्णयामुळे ८० लोकांनी जीव गमावला आहे. पण मोदी शांतपणे झोपतात. देशाला कॅशलेस अर्थव्यवस्थेविषयी धडे देतात अशी टीकाही त्यांनी केली आहे.

ममता बॅनर्जींच्या या विधानाचा भाजपने निषेध केला आहे. ममता बॅनर्जी या स्वतः एका पदावर आहेत, त्यांनी मोदींविरोधात अशी भाषा वापरणे निंदनीय असल्याचे भाजपने म्हटले आहे. स्वतःकडील काळा पैसा पांढरा न करता आल्याने ममता बॅनर्जींचे मानसिक संतूलन ढासळले अशी वादग्रस्त प्रतिक्रिया भाजप नेते सिद्धार्थ नाथ सिंह यांनी दिली.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सध्या आक्रमक झाल्या आहेत. नोटाबंदीवरुन त्यांनी दिल्लीत रान उठवले आहे. विरोधकांना एकत्र आणून त्यांचे नेतृत्व करण्याचे बॅनर्जींचे प्रयत्न सुरु आहेत. नोटाबंदीविरोधातील राष्ट्रपती भवनावरील मोर्चा, अरविंद केजरीवाल, शरद यादव या नेत्यांना मंचावर आणून ममता बॅनर्जी यांनी स्वतःच राजकीय वजनही वाढवलं आहे. आता नोटाबंदीविरोधात लखनौ आणि पाटणामध्ये बॅनर्जी सभा घेणार आहेत.  नोटाबंदीवरुन राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचे त्यांचे प्रयत्न कितपत यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.