दिल्लीचे नायाब राज्यपाल अनिल बैजल यांनी शनिवारी चार बिगर भाजपा शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी नाकारली. अरविंद केजरीवाल मागच्या सहा दिवसांपासून बैजल यांच्या कार्यालयात आंदोलनाला बसले आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकाचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिल्लीच्या नायाब राज्यपालांकडे केजरीवालांना भेटण्याची परवानगी मागितली होती. पण ही परवानगी नाकारण्यात आली आहे.

राज्यपालांच्या निवासस्थानी केजरीवाल आपल्या तीन सहकारी मंत्र्यांसह सोमवार संध्याकाळपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. दिल्लीतल्या आयएएस अधिकाऱ्यांनी संप मागे घ्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. परवानगी नाकारली असली तरी चारही मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थापासून राज्यपालांच्या निवासस्थानी मार्च करणार आहेत अशी माहिती आम आदमी पार्टीने दिली.