प. बंगालच्या मावळत्या राज्यपालांचे मत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे स्वत:च्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची दृष्टी आणि सामथ्र्य आहे, परंतु त्यांच्या तुष्टीकरणाच्या धोरणांचा विपरीत परिणाम राज्यातील सामाजिक सलोख्यावर होत आहे, असे मत राज्याचे मावळते राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी व्यक्त केले आहे.

ममता बॅनर्जी यांनी प्रत्येक नागरिकाकडे दुजाभाव न करता समानतेने पाहिले पाहिजे, असे त्रिपाठी म्हणाले. ममता यांनी आपल्या भावनांना आवर घालून संयम पाळला पाहिजे, असा सल्लाही राज्यपालांनी दिला. आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत त्रिपाठी यांचे ममतांशी अनेकदा खटके उडाले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे दृष्टी आहे, निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे सामथ्र्य आहे, परंतु त्यांनी संयम पाळणेही आवश्यक आहे, अनेकदा त्या भावनिक होतात त्यावर त्यांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असेही त्रिपाठी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

राज्यातील प्रत्येक नागरिकाकडे समानतेने पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ममता दुजाभाव करतात हे आपण पाहिले आहे का, असे विचारले असता त्रिपाठी म्हणाले की, दुजाभाव दिसून येत आहे, त्यांची विधाने दुजाभाव दर्शविणारी आहेत.