पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी जोरदार प्रचार सुरू असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने खुद्द ममता बॅनर्जी यांच्यावरच २४ तासांची प्रचारबंदी लागू केली आहे. सोमवार १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून मंगळवारी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या प्रचारमोहिमेला फटका बसला असून मंगळवारी ममतादीदींच्या सर्व प्रचारसभा रद्द करण्याची वेळ पक्षावर आली आहे. या पार्श्वभूमीवर ममतादीदींवरची ही प्रचारबंदी भाजपाच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे. २४ तास ममता बॅनर्जी प्रचारापासून दूर आणि पुढच्या प्रचारांमध्ये या मुद्द्याचं भांडवल करण्याची संधी असा दुहेरी फायदा भाजपाचा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

निवडणूक आयोगाने त्यासंदर्भातला आदेश सोमवारी संध्याकाळी काढला असून त्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या प्रचारसभांमधील वक्तव्य कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारी असल्याचं नमूद केलं आहे. “ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभांमध्ये केलेली वक्तव्य लोकांना उद्युक्त करणारी होती ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला बाधा येत आहे”, असं या आदेशांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

“मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि भविष्यात दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवीन”

प्रचारसभांमधील वक्तव्य भोवलं!

निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांनी केलेल्या दोन विधानांमुळे प्रचारबंदी घातली आहे. या दोन्ही विधानांसाठी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना ७ आणि ८ एप्रिल अशा दोन नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, त्यावर ममता बॅनर्जी यांनी केलेला खुलासा समाधानकारक न ठरल्यामुळे अखेर त्यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी यांनी ३ एप्रिल रोजी हुगळीमध्ये प्रचारसभेत भाषण करताना अल्पसंख्यकांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. “मी माझ्या अल्पसंख्य बंधु आणि भगिनींना हात जोडून विनंती करते, की त्यांनी भाजपाकडून पैसे घेऊन बोलणाऱ्या सैतानाचं ऐकून अल्पसंख्य मतांचं विभाजन होऊ देऊ नका. लक्षात ठेवा जर भाजपा सत्तेत आली, तर तुम्ही गंभीर संकटात सापडाल. मी माझ्या हिंदू बंधू-भगिनींनाही हेच आवाहन करेन”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

७ एप्रिल रोजी कूच बेहरमध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी सीएपीएफ या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना घेराव घालण्यासंदर्भात विधान केलं होतं. “जर सीएपीएफकडून अडथळे केले गेले, तर तुम्ही महिलांनी एक गट करून त्यांना घेराव घाला आणि दुसऱ्या गटाने मतदान करायला जा. तुमचं मत वाया जाऊ देऊ नका. जर तुम्ही सर्वजण त्यांना अडवण्यासाठी गेलात, तर त्यांना आनंदच होईल की तुम्ही मत दिलं नाही. हाच त्यांचा आणि भाजपाचा प्लॅन आहे”, असं विधान ममता बॅनर्जी यांनी केलं होतं.